Advertisement

‘ओखी’च्या भीतीने चैत्यभूमीवर प्रवेशबंदी?

ओखी वादळामुळे समुद्राला उधाण येण्याची शक्यता असल्याने हवामान खात्याने नागरिकांना समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे. या इशाऱ्यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून मुंबई महापालिकेच्या सूचनेनुसार आंबेडकर अनुयायांना चैत्यभूमीवर प्रवेश नाकारला जाण्याची दाट शक्यता आहे.

‘ओखी’च्या भीतीने चैत्यभूमीवर प्रवेशबंदी?
SHARES

भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी म्हणजेच ६ डिसेंबरला मोठ्या संख्येने जनसमुदाय त्यांना अभिवादन करण्यासाठी दादर पश्चिमेकडील चैत्यभूमीवर येतो. मात्र ओखी वादळामुळे समुद्राला उधाण येण्याची शक्यता असल्याने हवामान खात्याने नागरिकांना समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे. या इशाऱ्यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून मुंबई महापालिकेच्या सूचनेनुसार आंबेडकर अनुयायांना चैत्यभूमीवर प्रवेश नाकारला जाण्याची दाट शक्यता आहे.


धोका कशामुळे?

सूरतच्या दिशेने निघालेल्या ओखी वादळाच्या परिणामामुळे ४ ते ७ डिसेंबर दरम्यान मुंबईत जोरदार वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. समुद्राच्या लाटाही उसळण्याची शक्यता आहे. त्यातच चैत्यभूमी दादर चौपाटीला लागूनच असल्याने डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवर उपस्थित राहणाऱ्या आंबेडकर अनुयायांना देखील ही धोक्याची सूचना लागू होणार आहे.


रस्त्यावर येणार पाणी

सोमवार ते गुरुवारपर्यंत समुद्राला येणारी उंच लाटांच्या भरतीमुळे कॅडल रोड व शिवाजीपार्क परिसरात समुद्राचं पाणी शिरण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास अनुयायांना समुद्र किनारी जाण्यास मज्जाव करणं व त्यांच्याकरीता सुरक्षा उपाय राबवणं आवश्यक असल्याचं महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापनाने म्हटलं आहे.


महापालिकेकडून उपाययोजना

जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त रमाकांत बिरादर म्हणाले, चैत्यभूमीवर ६ डिसेंबरला येणाऱ्या अनुयायांच्या सेवा-सुविधेसाठी महापालिका सज्ज झाली आहे. त्यानुसार शिवाजीपार्क, दादर, प्रभादेवी, माहीम, धारावी भागांतील महापालिका शाळांसह सर्व खासगी शाळा आणि समाज केंद्र आदींच्या जागा सोमवार ते बुधवार या कालावधीत उपलब्ध करून देण्याचे आदेश या शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत.

सोबतच, दादर चौपाटी येथे समुद्रकिनारी सुरक्षा व्यवस्था सज्ज ठेवण्याचेही आदेश दिले आहेत. जेणेकरून कोणत्याही प्रकारची आणीबाणी उद्भवल्यास त्वरीत मदतकार्य उपलब्ध करून देता येईल.


वस्त्यांना सतर्कतेचा इशारा

ज्या प्रशासकीय विभागांमध्ये समुद्रकिनारे येतात, अशा विभागांचे सहायक आयुक्त यांनी समुद्रकिनाऱ्याजवळ असणाऱ्या वस्त्यांना सतर्कतेची सूचना देण्यास सांगितलं आहे. त्याप्रमाणे अग्निशमन दल, पोलीस, भारतीय तटरक्षक दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक, नौदल, स्थानिक यंत्रणा यांनाही सज्ज राहण्याच्या सूचनाही महापालिका आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिण्यात आल्या आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा