Advertisement

राज्यात पुढचे ३ तास महत्त्वाचे; मुंबईसह पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता

राज्यातल्या अनेक भागांत शुक्रवारी अचानक पावसानं हजरी लावली. सकाळी मुंबईच्या अनेक भागांत पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.

राज्यात पुढचे ३ तास महत्त्वाचे; मुंबईसह पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता
SHARES

राज्यातल्या अनेक भागांत शुक्रवारी अचानक पावसानं हजरी लावली. सकाळी मुंबईच्या अनेक भागांत पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. दादर, माटुंगा आणि माहिम भागांत अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यात पुढच्या ३ तासांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळं राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. येत्या १ ते २ दिवसांत ढगाळ वातावरण निवळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उत्तर महाराष्ट्रातही ढगाळ वातावरण राहणार असून, काही ठिकाणी गारपिटीची शक्यता कुलाबा वेधशाळेनं व्यक्त केली आहे.

राज्यातील 'या' भागांत पावसाची शक्यता

पुढील ३ दिवस उत्तर महाराष्ट्रातल्या धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यात मेघगर्जनेसह गारपिटीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पालघर जिल्ह्यात काही ठिकणी अवकाळी पावसाची हजेरी तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण, पालघर तालुक्यातील, बोईसर, पालघर, माहीम, केळवे, सफाळे, सातपाटी, भागात पाऊस सुरू झाला आहे. यामुळं नागरिकांनी हवामानचा अंदाज घेत घराबाहेर पडण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

रायगड जिल्ह्यात सर्वत्र पाऊस

महाड, पोलादपुर, रोहा, माणगाव, श्रीवर्धन, म्हसळा, अलिबाग, मुरुड, पेण, तळा, सुधागड, कर्जत, खालापुर, पनवेल, उरण सर्वच तालुक्यात पहाटेपासून पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी बरसल्या आहेत.

पुण्यातही पावसाची हजेरी

पुण्यातही अनेक भागांत सकाळपासून ढगाळ वातावरण असून पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागात पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. तर घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे पुणेकरांनी पावसाचा अंदाज घेत बाहेर पडा असं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा