Advertisement

मुंबई तुंबली - रेल्वे ठप्प, रस्ते जाम !


मुंबई तुंबली - रेल्वे ठप्प, रस्ते जाम !
SHARES

यंदा गणेशोत्सवाच्या आगमनापासून मुंबईत पावसानेही जोर धरला आहे. या रेकॉर्डब्रेक पावसामुळे मुंबई आणि उपनगरातील अनेक भागात पाणी साचल्याने रस्त्यावंर वाहतूक कोंडी झाली आहे. पुढील 48 तासापर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.


जराही विश्रांती न घेता सोमवारी संध्याकाळपासून पडत असेलेल्या या पावसामुळे हिंदमाता, सायन, घाटकोपर, माटुंगा, अंधेरी, वरळी इत्यादी भागात पाणी साचले आहे. याचा परिणाम मुंबईच्या रेल्वे वाहतुकीवरही दिसून येत आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील वाहतूक उशिराने सुरू आहे. त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. 




सायन-धारावी रोडहून वांद्र्याच्या दिशेला जाणारी वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस हाय वे देखील जाम झाला आहे.

मुंबईत गेल्या 24 तासांत 70 टक्के पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे पूर्व उपनगरात 1, पश्चिम उपनगरात 2 अशी एकूण 3 ठिकाणी घरे पडली.

जोरदार पावसामुळे चर्चगेटजवळ झाड कोसळले असून दादार टीटीजवळ पाणी साटल्याचे ट्वीट मुंबई पोलिसांनी केले आहे.  


युवासेनाचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनीही पावसासंदर्भात ट्वीट केले आहे.


या ठिकाणी झाले नुकासान


(जोरदार पावसामुळे खार पश्चिमेकडील जय भारत सोसायटी परिसरातील अनेक दुकानांचे नुकसान) 

(लोअर परळ रेल्वे स्टेशनचे रुळ पाण्याखाली)

(केईएम हॉस्पिटलच्या तळ मजल्यावर साचले पाणी)

(माटुंगा परिसरात अनेक ठिकाणी झाड कोसळल्याने रस्ते वाहतूक जाम)

(पावसामुळे सेनापती बापट मार्गावर पाणी साचल्याने वाहतूककोंडी)

(वरळीतील हनुमान गल्ली पावसामुळे तुंबली)

भारतीय हवामान खात्याने दिलेला इशारा तसेच सध्या सुरू असलेल्या पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करून मंत्रालयातील आणि मुंबईतील सर्वच शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दुपारी 2.30 वाजता कार्यालय सोडण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार सर्व कार्यालये दुपारीच सोडून देण्यात आली होती.
मंत्रालयातील आणि दक्षिण मुंबईतील शासकीय कार्यालयातील बहुतांश अधिकारी आणि कर्मचारी पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे तसेच बसद्वारे प्रवास करत असतात. त्यामुळे त्यांना दुपारी सोडण्याचे आदेश सरकारने दिले होते.


पुढील 4 तास धोक्याचे

भारतीय हवामान खात्याने मंगळवार, दिनांक 29 ऑगस्ट, 2017 रोजी दुपारी 1.00 वाजता दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील 4 तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर, अलिबाग, डहाणू आणि भोवतालच्या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याच बरोबर पुढील 48 तासात उत्तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणासाठी अतिवृष्टीचा हवामान खात्याने इशारा दिलेला आहे.


'सध्या काही माध्यमांवर लालबागचा राजाचे जोरदार वृष्टीमुळे दर्शन बंद केले असल्याच्या बातम्या देण्यात येत आहेत. या सर्व बातम्या खोट्या असून मंडळाच्या अतिशय चोख नियोजनामुळे दर्शन सुरळीत सुरू आहे. अनेक भाविक राजाच्या दर्शनासाठी रांगेत उभे आहेत. तरीही भाविकांनी खोट्या बातम्यांवर किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये', असे आवाहन लालबागच्या राजा सार्वजनिक मंडळाने केले आहे. 

याच सोबत 'मुसळधार पावसामुळे अडकलेल्या मुंबईकारांसाठी तात्काळ जेवणाची आणि नाश्त्याची व्यवस्था लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने केली आहे. लालबागचा राजा मेन गेट समोरील मदत कक्षात ही व्यवस्था केली आहे.' अशी माहितीही लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने दिली. 


महापौरांचे आवाहन

मुंबईत मंगळवारी दिवसभर 250 मि.मी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी तुंबले गेले आहे. ही एका प्रकारची नैसर्गिक आपत्तीच आहे. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीचा अंदाज आल्यानंतर आम्ही जनतेला आवाहन करून तुम्ही शक्यतो घराबाहेर पडू नकात तसेच जिथे असाल त्या कार्यालयात राहावे, अशी सूचना केली होती. त्याप्रमाणे आम्ही महापालिका कर्मचाऱ्यांची व्यवस्था कार्यालयात केली आहे. अडकलेल्या लोकांसाठी शाळांमध्ये व्यवस्था केलेली आहे. अनेक भागांमध्ये पाणी तुंबल्यामुळे विजेच्या प्रवाहामुळे कोणतीही दुघर्टना घडू नये यासाठी विद्युत पुरवठा खंडित केलेला आहे. मी स्वत: सकाळपासून रस्त्यांवर उतरुन लक्ष ठेवून असल्याचे मुंबई महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले. त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी जनतेच्या मदतीची गरज असून त्यांनी शक्यतो सुरक्षित ठिकाणी राहून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.


हेही वाचा - 

येत्या दोन दिवसांत मुंबई अशीच भिजणार!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा