यंदाचा उन्हाळी हंगाम सुरू झाल्याचं भारतीय हवामान खात्यानं (IMD) अधिकृतपणे जाहीर केलं आहे. मार्चपासून मे महिन्यापर्यंत तापमान (Temperature) कसं राहील, याचा वेध घेणारं एक पत्रकही हवामान खात्यानं प्रसिद्ध केलं आहे. दक्षिणेकडची काही राज्यं वगळता यंदा उन्हाच्या झळा अपेक्षेपेक्षा जास्तच तीव्र असतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मार्च, एप्रिल आणि मे या कडक उन्हाच्या महिन्यांमध्ये यंदा उत्तर भारत, ईशान्य भारत, वायव्य भारत आणि पूर्वेकडच्या काही भागांमध्ये सरासरीपेक्षा अधिक कमाल तापमान (Maximum Temperature) अनुभवायला मिळणार आहे. हिमालयाच्या पायथ्याशी असलेले प्रदेश, तसंच ईशान्य आणि दक्षिणेकडच्या काही राज्यांमध्ये या कालावधीतलं किमान तापमानही सरासरीपेक्षा जास्त असेल, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.
तरीही दक्षिण आणि मध्य भारतातल्या बहुतांश राज्यांमध्ये रात्रीचं किमान तापमान (Night Minimum Temperature) सरासरीएवढंच असेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
यंदा मार्च ते मे या कालावधीत गंगा नदीच्या खोऱ्यांतील प्रदेश - म्हणजेच पंजाब, चंडीगड, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक कमाल तापमान अनुभवायला मिळणार आहे. या भागांतलं कमाल तापमान सर्वसाधारण दीर्घकालीन सरासरीपेक्षा (LPA) ०.७१ अंश सेल्सिअसनं अधिक असू शकतं, असा अंदाज आहे.
ओडिशा, छत्तीसगडसह महाराष्ट्रातल्या कोकण विभागाला यंदा तीव्र उन्हाळ्याचा इशारा देण्यात आला आहे. या भागांमध्ये दिवसाचं तापमान सर्वसाधारण दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत ०.२५ अंश ते ०.८६ अंश सेल्सिअस अधिक असू शकतं आणि त्यात बदलही होत राहू शकतात. प्रामुख्यानं दक्षिणेकडच्या राज्यांत या कालावधीत रात्रीचं तापमान अधिक असू शकतं, असा इशाराही देण्यात आला आहे.