Advertisement

Mumbai Rains: घराबाहेर पडू नका! मुंबईकरांसाठी पोलिसांचा अलर्ट

गेल्या दोन दिवसांपासून मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह कोकण किनारपट्टीला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. त्यातच पुढच्या काही तासात वादळी वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Mumbai Rains: घराबाहेर पडू नका! मुंबईकरांसाठी पोलिसांचा अलर्ट
SHARES

गेल्या दोन दिवसांपासून मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह कोकण किनारपट्टीला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. त्यातच पुढच्या काही तासात वादळी वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई तसंच इतर ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेतला असून यंत्रणांना सतर्क राहण्यास सांगितलं आहे. (mumbai police issue alert for mumbaikars due to heavy rains)

मुंबई पोलिसांनी ट्विट करत नागरिकांसाठी अलर्ट जारी केला आहे. याद्वारे “मुंबईकरांनी घरातच थांबावं. महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नका, अशी आमची विनंती आहे. सर्व आवश्यक खबरदारी घ्या आणि समुद्रकिनारी किंवा पाणी भरलेल्या परिसरात जाऊ नका. आवश्यकता लागल्यास १०० क्रमांकावर फोन करा. काळजी घ्या आणि सुरक्षित राहा,” असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे.  

मुंबईत न थांबता मुसळधार पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात पावसाचा जोरदार मारा सुरु आहे. सतत सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलं आहेत. सखल भागातील घरे, दुकानांमध्ये पाणी शिरून सर्वसामान्यांचे हाल झाले आहेत. रस्ते तसंच रेल्वे वाहतुकीवरही पावसाचा मोठा परिणाम झाला आहे.

हेही वाचा - ऑगस्टच्या पहिल्या ५ दिवसांत मुंबईत ६१ टक्के पाऊस

राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीसुद्धा नागरिकांना घरातच राहण्याचं आवाहन केलं आहे. सर्वांना घरामध्येच राहण्याची विनंती. मुंबईत जोरदार वारा आणि मुसळधार पाऊस पडत आहे. मी सर्वांना, विशेषत: पत्रकारांना जे या पावसाचं वार्तांकन करण्यास बाहेर पडले आहेत, त्यांना सुरक्षित राहण्यासाठी विनंती करत आहे. आपण जिथं आहात तिथंच थांबा, असा सल्लाही आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.

मुंबई व उपनगरामध्ये दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जून आणि जुलैमध्ये फारसा पाऊस झाला नव्हता. मात्र, ऑगस्टच्या सुरूवातीपासून पावसाने जोर धरला आहे. मुंबईत ऑगस्टच्या पहिल्या पाच दिवसांत महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत ६१ टक्के पाऊस पडला आहे. महिन्याला सरासरी ५८५.२ मिमी पावसाची नोंद होते. मात्र, ऑगस्टमध्ये आतापर्यंत ३५७ मिमी पाऊस पडल्याची माहिती स्कायमेटने दिली आहे.  

गेल्या २४ तासात कोकण आणि गोव्यात मुसळधार पाऊस पडला. डहाणू आणि महाबळेश्वर अनुक्रमे ३८३ मिमी आणि ३२१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. स्कायमेटनुसार, गेल्या २४ तासात सांताक्रूझ येथे ८४ मिमी आणि कुलाबा येथे ५३ मिमी पावसाची नोंद झाली. उत्तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा क्षेत्र निर्माण झाल्याने आणि  दक्षिण गुजरातमध्ये चक्रीय चक्रवात तयार झाल्याने मुसळधार पाऊस झाल्याचं स्कायमेटच्या तज्ञांनी म्हटलं आहे. कोकण आणि गोवा आणि लगतच्या पश्चिम किनारपट्टीवर सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईत आज रात्रीपर्यंत मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल. त्यानंतर तीव्रता कमी होईल आणि पाऊस गुजरातच्या दिशेने जाईल, असं स्कायमेटने सांगितलं आहे.

हेही वाचा - Mumbai Rains : सोमवार-मंगळवार कोसळलेल्या पावसाची रेकॉर्ड ब्रेक नोंद

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा