आधी पालिका रुग्णालयात नाग, नंतर एका इमारतीत फॉस्टर्न कॅट जातीचा दुर्मिळ साप आणि आता अजगर! अशा वन्य प्राण्यांची उपस्थिती आढळल्याने सध्या मुलुंड हे चांगलेच चर्चेत आहे.
सोमवारी मुलुंडच्या एलबीएस मार्गावरील जॉन्सन अॅण्ड जॉन्सन गार्डनजवळ एका रिक्षा चालकाला तब्बल साडेसहा फुटांचा असा भला मोठा अजगर रास्ता ओलांडताना दिसून आला. रिक्षा चालकाने याचे गांभीर्य ओळखत ताबडतोब याची माहिती प्राणी मित्रांना दिली. त्यानंतर प्लँट अॅण्ड अॅनिमल वेल्फेअर सोसायटी या प्राणी मित्र संघटनेच्या तास दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर अजगराला पकडण्यात यश आले.
हा अजगर एलबीएस परिसरात शेजारीच असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून आला असल्याचा अंदाज प्राणीमित्रांनी व्यक्त केला आहे. हा अजगर वनखात्याच्या परवानगीने पुन्हा त्याच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आला आहे, अशी माहिती प्लँट अॅण्ड अॅनिमल वेल्फेअर सोसायटी या प्राणीमित्र संस्थेचे अध्यक्ष सुनिश कुंजू यांनी दिली आहे.
हेही वाचा -