Advertisement

रविवारी घ्या सुपरमूनचं दर्शन!

या पौर्णिमेला नेहमीच्या तुलनेत चंद्र पृथ्वीच्या आणखी जवळ येणार असल्यानं त्याचं रुपडंही खुलून दिसणार आहे. हा 'सुपरमून' इतका जवळ असेल की तुम्हाला त्याच्यासोबत मस्तपैकी सेल्फीही काढता येईल.

रविवारी घ्या सुपरमूनचं दर्शन!
SHARES

कला कलाने पूर्ण रूपात येतं दर पौर्णिमेला आपलं मोहक रूप दाखवणाऱ्या चंद्राचं सौंदर्य तुम्हाला येत्या रविवारी म्हणजेच ३ डिसेंबरला आणखी जवळून न्याहाळता येणार आहे. या मागचं कारण म्हणजे रविवारी मुंबईसह भारतभर 'सुपरमून' दिसणार आहे. या दिवशी नेहमीच्या तुलनेत चंद्र पृथ्वीच्या आणखी जवळ येणार असल्यानं त्याचं रुपडंही खुलून दिसणार आहे. हा 'सुपरमून' इतका जवळ असेल की तुम्हाला त्याच्यासोबत मस्तपैकी सेल्फीही काढता येईल.


'सुपरमून' म्हणजे काय?

पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ आला तर त्याला 'सुपरमून' असं म्हटलं जातं. 'सुपरमून' योगाच्या वेळेस पौर्णिमेचं चंद्रबिंब नेहमीपेक्षा सुमारे १४ टक्के मोठं आणि १६ टक्के जास्त तेजस्वी दिसतं. सन १९७९ मध्ये रिचर्ड नोले यांनी पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वीजवळ आलेल्या चंद्राला सर्वात पहिल्यांदा 'सुपरमून' असं नाव दिलं.


येत्या रविवारी ३ डिसेंबर रोजी मुंबईत 'सुपरमून' दिसेल. मार्गशीर्ष पौर्णिमेला संध्याकाळी ५ वाजून ५६ मिनिटांनी चंद्र रोहिणी नक्षत्रात असताना उगवेल. एरवी चंद्र पृथ्वीपासून सरासरी ३ लक्ष ८४ हजार कि. मी अंतरावर असतो. पण, यावेळी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीपासून ३ लक्ष ५७ हजार कि. मी अंतरावर येणार आहे. मार्गशीर्ष पौर्णिमा रात्री ९ वाजून १७ मिनिटांनी पूर्ण होईल. संपूर्ण रात्रभर आकाशात दर्शन दिल्यानंतर चंद्र सोमवारी सकाळी ७ वाजून २५ मिनिटांनी मावळेल.

- दा. कृ. सोमण, खगोल अभ्यासक, पंचांगकर्ते


रविवारी ३ डिसेंबरला चंद्र पृथ्वीच्या जवळ असेल. संध्याकाळी ६ ते ६.३० च्या दरम्यान 'सुपरमून' दिसेल. त्यावेळी आकाशात लाल रंगाच्या छटा देखील दिसतील. यावेळी चंद्राचा आकार नेहमीपेक्षा मोठा दिसेल. 'सुपरमून'ला उघड्या डोळ्यानंही पाहता येईल. चंद्र पृथ्वीभोवती लंब वर्तुळाकार कक्षेत प्रदक्षिणा घालताना पौर्णिमेला कधी कधी पृथ्वीच्या जवळ येतो. त्याला 'ऑर्बिट इलेप्टिकल' असं म्हणतात. 

- चिंतन जोशी, मार्गदर्शक, नेहरू प्लॅनेटोरिअम


यापूर्वी भारतात कधी दिसला होता?

यापूर्वी भारतात १४ नोव्हेंबर २०१६ रोजी 'सुपरमून' दिसला होता. त्यानंतर १ जानेवारी २०१८ रोजी पौष पौर्णिमेच्या रात्री 'सुपरमून' दिसणार आहे. यावेळी चंद्र पृथ्वीपासून ३ लक्ष ५६ हजार कि. मी. अंतरावर येणार असल्याचीही माहिती सोमण यांनी दिली.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा