'आयआयटी'चा मूड इंडिगो.....


SHARE

आशिया खंडातील सर्वात मोठा सांस्कृतिक फेस्टिव्हल अशी ओळख असलेला आयआयटी मुंबईचा ‘मूड इंडिगो’!, यंदा मूड इंडिगोचं ४७ वं वर्ष असून हा फेस्टिव्हल पवई येथील भव्य कॅम्पसमध्ये २२ ते २५ डिसेंबर दरम्यान रंगणार आहे. या फेस्टिव्हलची यंदाची थीम कार्निव्हल अशी आहे. यात नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रख्यात कलाकारांसमोर आपले नैपुण्य सादर करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. मूड इंडिगोचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक कार्यक्रमांचे आयोजन तर असतंच, पण प्रेक्षकांचाही उल्लेखनीय सहभाग असतो.


विविध स्पर्धांची रेलचेल

इतर कॉलेज फेस्टिव्हलपेक्षा कित्येक पटीने मोठा असलेल्या ‘मूड आय’मध्ये साहित्यापासून संगीतापर्यंत विविध स्पर्धा, इन्फॉर्मल्स, कॉन्सर्ट, प्रोशोज, कार्यशाळा, सामाजिक उपक्रम इत्यादी इव्हेंट्सचा समावेश असतो. यासर्व इव्हेंट्सच्या आखणीपासून ते अंमलबजावणीपर्यंत सर्व कामकाज आयआयटीयन्स स्वतः करतात. यामधील कोणताही इव्हेंट आऊटसोर्स केला जात नाही, ही कौतुकाची बाब म्हणावी लागेल. विशेष म्हणचे यावेळी ‘मूड आय’मध्ये तब्बल ११६ विविध स्पर्धा आणि इव्हेंट्सचा समावेश करण्यात आला आहे.


आयआयटीयन्स सज्ज

अवघ्या २ दिवसांवर येऊन ठेपलेल्या ‘मूड इंडिगो २०१७ च्या दिमाखदार उद्‍घाटनासाठी आयआयटीयन्स सज्ज झाले आहेत. देशभरातील विद्यार्थ्यांना कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ‘मूड इंडिगो’ची जान ‘स्पर्धा’ हीच आहे.
या फेस्टिव्हलमध्ये कला व संस्कृतीचा मिलाफ साधणाऱ्या नाटक, जीवनशैली, फाइन आर्ट्स, लिटररी आर्टस, संगीत, नृत्य, डिजिटल आर्टस, वक्तृत्वकला, डिझाइन (कलाकृती) या विभागांतील स्पर्धांचा समावेश आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या