खेळ, मनोरंजनासोबतच मुलांना सुरक्षेचे धडे

 Mankhurd
खेळ, मनोरंजनासोबतच मुलांना सुरक्षेचे धडे
Mankhurd, Mumbai  -  

शाळांना सुट्टी लागताच 'मामाच्या गावाला जाऊया' हे बालगीत आपसूकच मुलांच्या ओठावर येते. परंतु मुंबईत राहणारे असे असंख्य विद्यार्थी आहेत, ज्यांना गाव नाही किंवा काही अडचणींमुळे त्यांना गावी जात येत नाही. अशा विद्यार्थ्यांना सुट्टीच्या कालावधीत मनोरंजनाचे साधन उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने बाल अधिकार संघर्ष संघटना आणि युवा संस्थेने मानखुर्दच्या लल्लुभाई कम्पाऊंड येथे ‘समर कॅम्प 2017‘ चे आयोजन केले आहे.

सोमवारपासून या समर कॅम्पची सुरुवात झाली असून येत्या रविवारी त्याची सांगता होणार आहे. मुलांचा विकास व संरक्षण अशी यंदाच्या कॅम्पची संकल्पना असून छोट्यांमधील कलागुण व छंद जोपासण्यासाठी विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.

मानखुर्द पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या हस्ते या कॅम्पचे उद्घाटन करण्यात आले. कॅम्पमध्ये जास्तीत जास्त मुलांना सहभागी होता यावे, यासाठी या ठिकाणी विनामूल्य प्रवेश देण्यात येत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद या कॅम्पला लाभत असल्याचे मत प्रकल्प समन्वयक विजय खरात यांनी व्यक्त केले आहे. तसेच मुलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी नृत्य, अभिनय, बोलक्या बाहुल्यांचे खेळ यावर आधारीत प्रशिक्षण त्यांना देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Loading Comments