Advertisement

माणदेशाकडल्या वस्तू घ्या!


माणदेशाकडल्या वस्तू घ्या!
SHARES

'माणदेशी फाऊंडेशन' संस्थेने प्रभादेवीतील रवींद्र नाट्य मंदिर येथे माणदेशी महोत्सवाचं आयोजन केलं असून गुरुवारी या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. या महाेत्सवात ग्रामीण उद्योजक महिलांनी तयार केलेल्या वस्तू विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत.

'माण' या दुष्काळी भागातील महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने 'माणदेशी फाऊंडेशन'ची स्थापना करण्यात आली असून या संस्थेतर्फे या महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. याप्रसंगी माणदेशी फाऊंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा यांच्या ‘छावणी एक भागीरथी प्रयत्न’ या पुस्तकाचं अनावरण दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आलं.



२१ एप्रिल २०१२ ते १६ सप्टेंबर २०१३ या दीड वर्षांत १२,९३६ गुरांसाठी आणि ३ हजार कुटुंबाची चारा छावणी माणदेशी फाऊंडेशनने चालवली होती. या छावणीला कॅमेऱ्यात कैद करुन ते पुस्तकरुपाने प्रसिद्ध करण्यात आलं आहे. ज्येष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे.


काय आहे महोत्सवात?

या महोत्सवात ग्रामीण महिला उद्योजकांनी तयार केलेली माणदेशी जेन, घोंगडी, दळण्याचं जातं, खलबत्ते, केरसुण्या, दुरड्या, सुपल्या, माळरानातली गावरान ज्वारी, बाजरी, देशी कडधान्य, तसेच चटकदार चटण्या व मसाल्यांची चव चाखता येणार आहे.

यंदा माणदेशी महोत्सवात ९० ग्रामीण उद्योजक सहभागी झाल्या आहेत. घरच्या घरी तयार केलेल्या सातारी टच असलेल्या विविध चटण्या, लोणचं, खर्डा, ठेचा, शेव-पापडापासून ते पेयांपर्यंत सारं काही उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे हातमागावरील कलाकुसर केलेल्या शाली, साड्या, दुपट्टे, ब्लाऊज, ड्रेस मटेरिअल्स खरेदी करता येतील. यावर्षी कर्नाटक, काश्मीर, लखनौ आणि कलकत्ता येथील कारागीरांना देखील महोत्सवासाठी निमंत्रित करण्यात आलं आहे.



आत्मविश्वास देणारा महोत्सव

गेल्यावर्षी २० हजार मुंबईकरांनी माणदेशी महोत्सवाला भेट दिली होती. नंदा शेलार या शेतकरी महिलेने त्यांच्या शेतात पिकलेल्या १५० किलो भाताची विक्री केली होती. सद्यस्थितीत त्या भाताच्या मोठ्या उत्पादक विक्रेत्या आहेत. माणदेशी महोत्सवामुळे वाढलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर त्या गावच्या सरपंच म्हणून कार्यरत आहेत. अशा अनेक यशोगाथा माणदेशी महोत्सवाने साकार केल्या आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा