Advertisement

छोट्या पडद्यावर अवतरणार 'मोलकरीण बाई'

घरकाम करणाऱ्या बाईंचं त्यांच्या मालकीणींसोबत असणारं हृदयस्पर्शी नातं या मालिकेतून उलगडण्यात येणार आहे. अशा स्त्रियांची आहे, ज्यांचं आयुष्य संघर्ष आणि व्यथांनी भरलेलं असलं तरी जीवनाकडं सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा अनमोल संदेश त्या देतात.

छोट्या पडद्यावर अवतरणार 'मोलकरीण बाई'
SHARES

काही वर्षांपूर्वी मोलकरीणीवर आधारित असलेल्या 'गंगूबाई नॅान मॅट्रीक' या मालिकेनं प्रेक्षकांना वेड लावलं होतं. निर्मिती सावंत यांनी साकारलेल्या गंगूबाईवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं होतं. आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर 'मोलकरीण बाई' अवतरणार आहे.


वेगळं कथानक

आज मोलकरीण ही घरातील एक अविभाज्य घटक बनली आहे. एक दिवस तिने सुट्टी घेतली की, घरातील सर्व व्यवस्था कोलमडून पडते. मग मालकीणबाईंनाच पदर खोचून कामाला लागावं लागतं. त्यामुळं आजच्या काळात मोलकरीण बाईंना खूप मान आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू होणाऱ्या 'मोलकरीण बाई' या नव्या मालिकेत नेमकं काय पाहायला मिळणार याबाबत जास्त काही सांगण्यात आलं नसलं, तरी काहीशा वेगळ्या कथानकावर ही मालिका आधारित असल्याचं जाणीव मात्र नक्की होते.


१८ मार्चपासून प्रसारीत

अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांसोबतच घरकाम करणारी बाई ही नोकरदार स्त्रियांच्या आयुष्यातली महत्त्वाची व्यक्ती आहे. जिच्या असण्यानं आयुष्य जितकं सुखकर होतं तितकंच तिच्या नसण्यानं अस्ताव्यस्त. कधी ती असते ताई, कधी मावशी, कधी काकू तर कधी नुसतीच बाई. कुटुंबातली सदस्य नसली तरी कुटुंबातलाच एक अविभाज्य भाग. आपल्या आयुष्यातल्या याच महत्त्वाच्या व्यक्तीची गोष्ट सांगणारी 'मोलकरीण बाई' ही मालिका १८ मार्चपासून प्रसारीत होणार आहे.


हृदयस्पर्शी नातं

घरकाम करणाऱ्या बाईंचं त्यांच्या मालकीणींसोबत असणारं हृदयस्पर्शी नातं या मालिकेतून उलगडण्यात येणार आहे. ही गोष्ट आहे अशा स्त्रियांची आहे, ज्यांचं आयुष्य संघर्ष आणि व्यथांनी भरलेलं असलं तरी जीवनाकडं सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा अनमोल संदेश त्या देतात. आपल्या आयुष्यात घडणारे अनेक छोटे-मोठे प्रसंग ही मालिका पाहताना प्रेक्षकांना आठवतील. या मालिकेत उषा नाडकर्णी, भार्गवी चिरमुले, सारिका निलाटकर, सुप्रिया पाठारे, अश्विनी कासार आणि गायत्री सोहम यांच्या भूमिका आहेत.


सपोर्ट सिस्टीम

'मोलकरीण बाई' या मालिकेतून खूप महत्त्वाचा विषय हाताळण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचं 'स्टार प्रवाह'चे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले. घरकाम करणारी बाई ही आपल्या आयुष्यातली खूप महत्त्वाची व्यक्ती आहे. म्हणूनच तर त्यांना आपण सपोर्ट सिस्टीम म्हणतो. याच मंडळींच्या आयुष्यात डोकावणारी ही मालिका असेल. या मालिकेची गोष्ट त्या तमाम स्त्रियांना अर्पण आहे ज्या कोणत्याही परिस्थीतीवर मात करत हसतमुखानं आपली काम चोख बजावतात असंही राजवाडे म्हणाले.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा