शिवडी कोळीवाड्यात १०० वर्ष जुनी होळी!

 Sewri Koliwada
शिवडी कोळीवाड्यात १०० वर्ष जुनी होळी!

शिवडी - महाराष्ट्राच्या परंपरेचा अविभाज्य भाग असलेला सण म्हणजे होळी. हा सण आजही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मुंबईतील अनेक कोळीवाड्यांमध्ये अगदी जुन्या पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करण्याची पद्धत आजही रूढ आहे. मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या होळी उत्सवांपैकी एक म्हणजे शिवडी-कोळीवाड्याची होळी. ही होळी स्वतंत्र्यपूर्व काळापासून साजरी केली जाते. पुरुषांपेक्षा महिलांना प्राधान्य देऊन रविवारी रात्री 12 वा. साजरी करण्यात आली. ही प्रथा इथे 100 वर्षे जुनी असल्याचे बालक-पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष सुनील कोळी आणि सरचिटणीस रुपेश ढेरंगे यांनी सांगितले.

शिवडी पूर्व स्थानकापासून हाकेच्या अंतरावर वसलेला शिवडी-कोळीवाडा ही 100 वर्षांहून अधिक जुनी कोळी वस्ती असून, इथे अनेक सण पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात. मात्र होळी हा उत्सव इथे महत्वपूर्ण मानला जातो. 

हा उत्सव साजरा करण्यासाठी येथील महिला एकच प्रकारचे आणि रंगांचे कपडे परिधान करून तसेच सजावट केलेले माठ डोक्यावर घेऊन परिसरात वाजत, गाजत मिरवणूक काढतात. यात बच्चेकंपनीही आनंदाने सहभागी होतात. 

त्यानंतर पारंपरिक पद्धतीने उभ्या केलेल्या या होळीच्या भोवती फेऱ्या मारून प्रत्येक महिला होमात डोक्यावर घेतलेल्या त्या माठांचे दहन करतात. त्याबरोबर उसांच्या पेंढ्याचे देखील दहन या पेटत्या होळीत करतात. जेणेकरून या परिसरातील सर्व नकारात्मक विचारांचा अंत होऊन येथे सर्व सकारात्मक घडेल अशी आशा येथील स्थानिकांना वाटते. हा सण एकंदरीत अशा पद्धतीने साजरा करण्याची प्रथा जोसेफ कोळी यांनी सुरु केली होती. ही प्रथा आजतागायत कायम ठेवण्यासाठी समाजसेवक थॉमस कोळी यांचे मोलाचे सहकार्य असते.

Loading Comments