Advertisement

मुंबईत फटाके फोडण्यावर बंदी, फक्त 'या' दिवशीच मुभा

'दीपावली' आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून, यंदा अनोख्या पद्धतीनं दिवाळी (diwali) साजरी करण्यात येणार आहे.

मुंबईत फटाके फोडण्यावर बंदी, फक्त 'या' दिवशीच मुभा
SHARES

'दीपावली' आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून, यंदा अनोख्या पद्धतीनं दिवाळी (diwali) साजरी करण्यात येणार आहे. कोरोनाचं सावट दिवाळीवर असल्यानं राज्य सरकार व महापालिकेनं खबरदारी घेण्याचं आवाहनं केलं आहे. 'दिवाळी' म्हटलं तर फटाक्यांची आतषबाजी (fire crackers) डोळ्यासमोर येते. परंतू, यंदा कोरोनामुळं फटाके मर्यादित स्वरूपात फोडण्याचं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी केलं आहे. त्याशिवाय, फटाक्यांच्या धुराचा कोरोनाबाधित रुग्णांना त्रास होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन महानगरपालिका क्षेत्रात फटाके फोडणं किंवा आतषबाजी करणं यावर बंदी घालण्यात येत आहे.

यंदाच्या दिवाळीत दारापुढे रांगोळी काढताना आणि पणत्या लावताना त्यासोबत पाण्यानं भरलेली बादली आणि साबण दरवाजा जवळ ठेवायचा आहे. जेणेकरुन घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तिला हात-पाय-चेहरा योग्यप्रकारे धुवूनच घरात प्रवेश करता येईल, अशी मार्गदर्शक सूचना करण्यात येत आहे.

कोरोना बाधित रुग्णांमध्ये श्वसनाचा मुख्य प्रश्न असतो आणि त्यांची प्राणवायू पातळी खालावण्याची संभाव्यता असते. ही संभाव्यता लक्षात घेऊन आणि फटाक्यांच्या (crackers) धुराचा कोविड रुग्णांना त्रास होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक परिसर, खासगी परिसर इत्यादी सर्व ठिकाणी कोणत्याही प्रकारचे फटाके फोडता येणार नाहीत किंवा तत्सम स्वरुपाची आतशबाजी महानगरपालिका क्षेत्रात कुठेही करता येणार नाही.

हॉटेल, क्लब, जिमखाना, संस्था, व्यवसायिक परिसर, विविध समूह इत्यादींद्वारे आणि त्यांच्याशी संबंधित परिसरांमध्ये कोणत्याही प्रकारचे फटाके फोडता येणार नाहीत किंवा तत्सम स्वरुपाची आतशबाजी आणि त्या संबंधीचे कार्यक्रम करता येणार नाहीत. नियमभंग करणाऱ्यांवर महानगरपालिका व पोलीस यांच्याद्वारे संयुक्तपणं कडक कारवाई करण्यात येणार आहे.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी केवळ सोसायटीचे अंगण / घराचं अंगण इत्यादी खासगी परिसरांमध्येच सौम्य स्वरूपाचे फटाके फोडण्यास मर्यादित स्वरूपात परवानगी देण्यात आली आहे. मात्र, यावेळी नागरिकांनी कोरोना विषयक आवश्यक ती खबरदारी घ्यावयाची आहे. यामध्ये प्रामुख्यानं मास्क वापरणं, शारीरिक दुरीकरण पाळणं व साबणानं हात स्वच्छ धुणं इत्यादी बाबींची काळजी घ्यावयाची आहे.

दिवाळीचे दिवे लावताना, मर्यादित स्वरुपात आतशबाजी करताना आणि फटाके फोडताना हाताला सॅनिटायजर लावलेले नसल्याची खात्री करुन घ्यावी. सदर प्रसंगी सॅनिटायजरच्या संपर्कात येणे टाळावे किंवा सॅनिटायजरचा वापर करु नये. तसेच सॅनिटायजरची बाटली अगर कुपी आपल्याजवळ बाळगू नये.

खबरदारीची उपाययोजना म्हणून हात स्वच्छ करताना सॅनिटायजरऐवजी साबण व पाण्यानं हात सुयोग्यप्रकारे व नियमितपणे धुण्यास प्राधान्य द्यावं.

कोरोना विषयक घ्यावयाची महत्वाची खबरदारी

  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साजरा होत असलेला यंदाचा दिवाळसण साजरा करताना शारीरिक दुरीकरण पाळणे, वारंवार साबणाने सुयोग्यप्रकारे हात धुणे आणि घराबाहेर पडताना किंवा घरी पाहुणे आले असल्यास त्यांच्यासह सर्वांनी सुयोग्यप्रकारे मास्क वापरणे अत्यंत गरजेचे आहे.
  • यावर्षीची दिवाळी ही नियंत्रित स्वरुपात साजरी करावयाची असल्यानं दिवाळीच्या काळात कोणत्याही प्रकारचे सामाजिक एकत्रिकरण (Social Gathering) टाळावं.
  • भाऊबिजेच्या दिवशी बहिणीने भावाला ओवाळताना शक्यतो दृकश्राव्य प्रणालीद्वारे (Online Video Conferencing) ओवाळावे, तर भावाने देखील शक्यतो ऑनलाईन पद्धतीनेच ओवाळणी द्यावी.
  • अपवादात्मक प्रसंगी एखाद्या घरी जाणे आवश्यक असल्यास घरात प्रवेश करण्यापूर्वी हात, पाय व चेहरा इत्यादी व्यवस्थितपणे साबण लावून धुवून घ्यावा. त्यानंतर ओले हात-पाय पुसण्यासाठी ज्यांच्या घरी गेलो आहोत, त्यांचा रुमाल वापरण्याऐवजी स्वतःचा रुमाल वापरावा. तसेच  घरात प्रवेश करताना व प्रवेश केल्यानंतर मास्क परिधान करावा.
  • दिवाळीकरिता काही खरेदी करण्यासाठी बाहेर जाणं गरजेचं असल्यास शक्यतो कमी गर्दीच्या वेळी व कमी गर्दीच्या ठिकाणी जाण्यास प्राधान्य द्यावं.
Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा