चेंबूर - दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील चेंबूर प्रतिष्ठानच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. चेंबूर कॉलनी, वडवली गाव आणि चेंबूर स्थानक ते चेंबूर नाका अशी ही मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीमध्ये मुख्य आकर्षण असणार आहे ते चेंबूरमधील जय मार्तंड ढोल ताशा पथक. या पथकात एकूण 70 ते 80 तरुण-तरुणी सहभाग घेणार असल्याची माहिती पथकाचे अध्यक्ष विशाल गवळी यांनी दिली आहे. भाजपा नगरसेवक महादेव शिगवण यांच्या चेंबूर प्रतिष्ठान आणि नगरसेविका आशाताई मराठे यांच्याकडून हा कार्यक्रम पार पडत असल्याने यामध्ये भाजपाचे रंग दिसणार आहेत.
चेंबूर सुभाषनगर येथून नगरसेविका आशाताई मराठे यांची शोभायात्रा सकाळी 8 वाजता निघणार असून, चेंबूर रेल्वे स्थानक आणि सिद्धार्थ कॉलनी करत ही शोभायात्रा चेंबूर नाका येथे पोहोचणार आहे.
तर महादेव शिगवण यांची शोभायात्रा देखील याच दरम्यान चेंबूर कोकणनगर येथून निघणार असून, चेंबूर कॅम्प, वडवली, चिमणी गार्डन, डायमंड गार्डन मार्गे हि शोभायात्रादेखील चेंबूर नाका येथे येणार असून याठिकाणी एकत्र आल्यानंतर या कार्यक्रमाची समाप्ती होणार आहे.