Advertisement

दादरमध्ये दुर्गा देवीच्या मूर्तींना दिला जातोय 'फिनिशिंग टच'


दादरमध्ये दुर्गा देवीच्या मूर्तींना दिला जातोय 'फिनिशिंग टच'
SHARES

नवरात्रोत्सव अवघ्या आठवड्याभरावर येऊन ठेपल्यानं देवीची मूर्ती घडविणाऱ्या कारागिरांची लगबग वाढली आहे. महाराष्ट्रातील भाविक ज्याप्रमाणं अंबा देवीची या काळात पूजा करतात, त्याचप्रमाणे बंगाली बांधव नवरात्रीच्या शष्टीपासून ते दसऱ्यापर्यंत दुर्गा मातेची पूजा करतात.

या निमित्तानं बंगाली दुर्गा मातेच्या देखण्या, मोहक मूर्तींना दादरच्या शिवाजी पार्क येथील महापालिकेच्या मैदानात 'फिनिशिंग टच' देण्याचं काम सुरू आहे. सध्या या कार्यशाळेत ३.५ फुटांपासून ते १४ फूट उंचीपर्यंतच्या दुर्गा देवीच्या मूर्ती तयार करण्याचं काम वेगात सुरू आहे. शिवाजी पार्कमधील ही कार्यशाळा ४० वर्षांपूर्वी कोलकाताचे मूर्तीकार निमाय पाल यांनी सुरू केली. निमाय पाल यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा अमित पाल सध्या ही कार्यशाळा सांभाळत आहे. 



या कार्यशाळेत ५० हजारांपासून ते ३ लाख रुपये किंमतीच्या मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. मागील ५ वर्षांपासून या कार्यशाळेतून ६ फूट उंच दुर्गा मातेची मूर्ती श्रीलंकेत पाठवण्यात येत आहे. यंदा ही मूर्ती सोमवारी ११ सप्टेंबर रोजी पाठवण्यात आली. 

शहरात अनेक ठिकाणी नवरात्रीच्या काळात देवीच्या मूर्तींची प्रतिष्ठापणा केली जाते. त्यापैकी बऱ्याचशा मूर्ती शिवाजी पार्कच्या या कार्यशाळेत तयार केल्या जातात. मुंबई शहरासह उपनगरातील मंडळं देखील या कार्यशाळेतून मूर्ती बनवून घेतात. अंधेरी, ठाणे, मालाड बोरिवली, वांद्रे, अँटॉप हिल, परळ या ठिकाणी देखील या मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. दरवर्षी किमान बंगाली दुर्गा मातेच्या ५० मूर्ती, नवरात्रीच्या अंबे मातेच्या २० मूर्ती अशा किमान ७० मंडळांच्या मूर्ती या वर्कशॉपमध्ये बनवण्यात येतात.



त्यामध्ये सांताक्रूझमधील नवदुर्गा मित्र मंडळाची ९ फुटांची वाघावर आरूढ देवीची मूर्ती गेल्या अनेक वर्षांपासून या कार्यशाळेत तयार केली जात आहे. मातीच्या देवीची मूर्ती इको फ्रेंडली असल्यामुळे मंडळ दरवर्षी या कार्यशाळेतून मूर्ती बनवून घेते. त्याच बरोबर शिवाजी पार्क मैदानातील प्रसिद्ध अशी बंगाली देवीची मूर्ती देखील याच कार्यशाळेत घडते, अशी माहिती मूर्तीकार उत्तम पाल यांनी दिली.


अभिनेत्री राणी मुखर्जी, अभिजित भट्टाचार्य यांच्या सोसायटीत दुर्गा देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. अनेक बंगाली सिने कलाकार देखील येथून आपल्या देवीची मूर्ती तयार करून घेतात.
- उत्तम पाल, मुख्य मूर्तीकार



अशी होते मूर्ती तयार

बंगाली दुर्गा देवीच्या मूर्तीचे मुख्य आकर्षण म्हणजे या मूर्ती उंच आणि देखण्या असतात. त्यामुळे मूर्ती घडवताना त्याला बांबूचा आधार दिला जातो. मूर्ती तयार करताना ज्युट, गवत, सुतळी आणि गंगा पत्रातील लाल मातीचा वापर केला जातो. शिवाजी पार्क जवळ असलेल्या या कार्यशाळेतील मूर्तीकार खास कोलकात्यावरून या ठिकाणी मूर्ती बनवण्यासाठी येतात. 

या कलाकारांना जागेची कमतरता भासू नये यासाठी मुंबई महापालिका दरवर्षी या कलाकारांना जागा उपलब्ध करून देते. सध्या कोलकात्यावरून २० कलाकार या ठिकाणी आले आहेत. त्याचं काम मागील ३ महिन्यांपासून सुरू आहे. सध्या कलाकार मूर्तींना 'फिनिशिंग टच' देऊन उत्सवासाठी सज्ज करत असल्याचे या कार्यशाळेत दिसत आहे. 




हेही वाचा - 

तामिळ भाषिकांचा नवरात्रोत्सव अर्थात 'गोलू', सजावटीच्या मूर्ती खरेदीला वेग

माऊंट मेरी जत्रेचा आनंद लुटा, पण या ३ गोष्टींची काळजीही घ्या!



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा