Advertisement

इंद्रवदन सोसायटीचा शतक महोत्सवी गणेशोत्सव


इंद्रवदन सोसायटीचा शतक महोत्सवी गणेशोत्सव
SHARES

सध्या सर्व ठिकाणी गणपती बाप्पाच्या आगमनाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. गेले कित्येक महिने आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेल्या भाविकांच्या घरात आणि मंडळात बाप्पा विराजमान झाला आहे. मुंबईतील अशाच काही निवडक गणपती मंडळाचा इतिहास, फोटो, वैशिष्ट्य याबाबतची माहिती या 11 दिवसांत तुम्हाला 'मुंबई लाइव्हर' मिळणार आहे.

IMG-20180918-WA0044.jpg

मंडळाला १०० वर्षे पूर्ण

इंद्रवदन सोसायटी हे गणेश मंडळ शिवाजी पार्क परिसरातील सर्वात जुनं मंडळ असून त्याची स्थापना १९१८ साली झाली. सामाजिक आणि सार्वजनिक कार्यात विशेष ओळख असलेल्या या मंडळाला यंदा १०० वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्तानं यंदाच्या संपूर्ण वर्षभर वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची पर्वणी तसंच विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. विशेष म्हणजे यंदा या मंडळानं पुण्यातील माळीवाड्याचा देखावा साकारला आहे.

IMG-20180918-WA0043.jpg


रहिवासीच करतात सजावट

लोकमान्य टिळकांनी सामाजिक एकता निर्माण करण्यासाठी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून दादरमधील तुळशीदास तेजपाळ चाळीत (इंद्रवदन सोसायटी) १९१८ साली गणपतीची स्थापना करण्यात आली. या सोसायटीच्या गणपतीचं स्वरूप सार्वजनिक असलं तरी दरवर्षी बाप्पाची मूर्ती फक्त दीड फुटांची असते. विशेष म्हणजे या गणपतीचं संपूर्ण सजावट, जेवण, फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी या सर्व गोष्टी सोसायटीमध्ये राहणारे रहिवासीचं करतात.

राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक प्रबोधनाची परंपरा जपत या गणेशोत्सव मडळानं रौप्य महोत्सव (२५), सुवर्ण महोत्सव (५०), हीरक महोत्सव (६०), अमृत महोत्सव (७५) अगदी धुमधडाक्यात साजरे केले आहेत. त्यानुसार यंदा या सोसायटीच्या गणेशोत्सवाचं शतक महोत्सवी वर्ष साजरं करण्यात येत असून इंद्रवन सोसायटीच्या परंपरेप्रमाणे सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक अशा विविध कार्यक्रम या मंडळानं आयोजित केले आहे.


'या' मान्यवरांनी लावली हजेरी

आतापर्यंत या मंडळात भीमसेन जोशी, ह्दयनाथ मंगेशकर, मंगेश पाडगावकर आणि व. पु. काळे यांसारख्या ज्येष्ठ मान्यवरांनी हजेरी लावली आहे. तसंच सामाजिक जाणीव ठेवत या मंडळानं ओला आणि सुका कचरा प्रकल्प, वैद्यकीय सेवा, महिला आश्रमाला मदत यांसारखे अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. या मंडळाचे देखावे अगदी साध्या पद्धतीचे असले तरी ते आकर्षक पद्धतीने सादर केले जातात. जुन्या पद्धतीच्या चाळी, डोंगर, पेशवेकालीन मंदिर देखावे तयार केले असून हे सर्व देखावे इकोफ्रेंडली पद्धतीनं बनवण्यात येतात. या सोसायटीत राहणाऱ्या लोकांनी अगदी प्रोफेशनल पद्धतीनं केलेला देखावा पाहण्यासाठी अनेक भाविक आवर्जून इथं येतात.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा