पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर आणि कोकणात मुसळाधार पावसामुळं पूरस्थिती निर्माण होऊन लाखो कुटुंब बेघर झाली आहेत. त्यामुळं या पूरग्रस्तांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय दहीहंडी उत्सवाच्य आयोजकांनी घेतला आहे. मुंबईतील अनेक आयोजकांनी दहिहंडीचा कार्यक्रम रद्द करुन कार्यक्रमात होणारा सर्व खर्च पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजपा आमदार राम कदम यांनी यावर्षी घाटकोपरमधील प्रसिद्ध दहीहंडीचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पूरपरिस्थितीमुळे सर्वत्र भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच या पुरात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते. आता त्या ठिकाणचे पाणी ओसरायला लागले असून मदत कार्याने जोर धरला आहे. त्यातच आता सर्वच स्तरातून मदतीचा हात पुढे करण्यात येत असून आता राम कदम यांनीदेखील दहीहंडीचा उत्सव रद्द करून त्यासाठी खर्च करण्यात येणारी रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच, इतर दहीहंडी आयोजकांनाही सोहळा रद्द करण्याचं आवाहन केलं आहेत. हा सोहळा साधेपणानं साजरा करत संपूर्ण निधी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचं आवाहनही त्यांनी केले.
गेली १३ वर्षे उत्तर मुंबईत साजरा होणारा शिवसेनेचे मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांचा प्रसिद्ध दहीहंडी उत्सव रद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी बोरिवली पूर्व देवीपाडा इथं आमदार सुर्वे यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात येतो. तसंच, आकर्षक बक्षिसे व हंडी फोडणाऱ्या मंडळांना चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात येते. मात्र यंदा हा दहिहंडी उत्सव रद्द करण्यात आला आहे, कोल्हापूर व तळकोकणात अलिकडेच झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागाचं सुमारे मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. त्यामुळं सामाजिक बांधिलकी जपत त्यांचे संसार उभं करणं हे आद्य कर्तव्य समजून आम्ही यंदाचा दहीहंडी उत्सव रद्ध केला आहे. दहीहंडीचा निधी आम्ही शिवसेना पूरग्रस्त सहाय्यता निधीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडं सुपूर्द करणार आहे.
वरळीमधील जांभोरी मैदानातील शिवसेना नेते सचिन अहिर यांच्या संकल्प प्रतिष्ठानातर्फे होणारा दहिहंडी उत्सव रद्द करण्यात आला आहे. संकल्प प्रतिष्ठान दहिहंडीचे आयोजक सचिन आहिर यांनी आयोजनाचा सर्व खर्च पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा -
‘सेक्रेड गेम्स’ वादात, शीख धर्मियांच्या भावना दुखावल्याप्रकरणी अनुराग कश्यपविरोधात तक्रार
गणेशोत्सव २०१९: अग्निशमन दलाचं लालबागच्या राजाला १७ लाखांच बिल