Advertisement

नाताळनिमित्त ठाणे कारागृहातील केकला ठाणेकरांची पसंती

शिक्षा भोगून कैदी बाहेर पडल्यावर त्यांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडून त्यांना बेकरी प्रशिक्षण दिले जाते.

नाताळनिमित्त ठाणे कारागृहातील केकला ठाणेकरांची पसंती
SHARES

अवघ्या एका दिवसांवर येऊन ठेपलेल्या ख्रिसमससाठी विविध सजावटीच्या साहित्यांसोबत वेगवेगळ्या प्रकारच्या केकनी बाजार सजले असताना, ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांचीही नाताळसाठी लगबग सुरू आहे. ही लगबग कारागृहातील नाताळ जल्लोशात साजरा करण्यासाठी नव्हे, तर बाजारातून वाढलेली केकची मागणी पूर्ण करण्यासाठीची आहे.

नाताळच्या निमित्ताने ठाणे कारागृहात कैदी मोठ्या प्रमाणावर केक तयार करतात. गेल्या वर्षी या कैद्यांनी तब्बल २०८० किलो स्पंज केक आणि १४ हजार ८८० कपकेक बनवून विक्रीसाठी पाठवले होते. मात्र यंदा त्याहीपेक्षा जास्त मागणी असल्याने या कैद्यांना सध्या १२ तास काम करावं लागत आहे. कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना चांगल्या कामात व्यस्त ठेवण्याच्या हेतूने सुरू असलेल्या उपक्रमाचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. शिक्षा भोगून कैदी बाहेर पडल्यावर त्यांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडून त्यांना बेकरी प्रशिक्षण दिलं जातं. तसंच त्यांना विणकाम, हस्तकला, सुतारकाम, शेती आदी कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. यंदा ठाणे कारागृहाला ५ लाख २३ हजार रुपये किंमतीच्या कप केकची आॅर्डर मिळाली आहे.  या कप  केकची किंमत ८ रुपये, तर स्पंज केकची किंमत २०० रुपये इतकी आहे.

आतापर्यंत कैद्यांनी २८ हजार कपकेक आणि २ हजार किलो स्पंजकेक बनवले असून हे केक भायखळा, आर्थररोड, आधारवाडी, तळोजा यासह विविध बेकऱ्यांमध्ये विक्रीसाठी पाठवलेले आहेत. सणांच्या काळात येथील बेकरीमध्ये तयार होणाऱ्या पदार्थाना मोठी मागणी आहे. दिवाळीत फराळाचे विविध पदार्थ हे कैदी तयार करतात. त्याचप्रमाणे नाताळसाठी स्पंजकेक, कपकेक, पाइनअ‍ॅपल केक, चॉकलेट केक असे विविध चविष्ट केक येथे तयार केले जातात. दक्षिण क्षेत्रातील भायखळा कारागृह, मुंबई मध्यवर्ती कारागृह, कल्याण जिल्हा मध्यवर्ती कारागृह, तळोजा कारागृह, तसेच फ्रीडम फाउंडेशन, सीड्स ऑफ होप फाउंडेशन आदी संस्थांकडून या पदार्थाना अधिक मागणी आहे. स्पंज केक १५० रुपये किलो, कपकेक ७ रुपये नग, अननस केक ३८० रुपये किलो तर चॉकलेट केक ४५० रुपये किलोने विकला जात आहे. 

कैद्यांच्या दैनंदिन कामाची वेळ सकाळी ७ ते ४ असते. मात्र नाताळच्या निमित्ताने केकची प्रचंड मागणी असल्याने कैद्यांनी रात्री १२ पर्यंत काम करण्याची मुभा कारागृह प्रशासनाने दिली आहे. कुशल कैद्यांना प्रतिदिन ५५ रुपये, अर्धकुशल कैद्यांना ५० तर अकुशल कैद्यांना दररोज ४० रुपये एवढे भत्ता दिला जातो. सणानिमित्ताने कैद्यांना दुप्पट कमाई करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.



हेही वाचा -

रेल्वे स्थानकात अवतरला सांताक्लॉज




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा