Advertisement

मोहरमसाठी नियमावली जाहीर, मातम मिरवणुकीस परवानगी नाही

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मुस्लीम बांधवांचा मोहरम सण साजरा करण्यासंदर्भात राज्य सरकारच्या गृह खात्याने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

मोहरमसाठी नियमावली जाहीर, मातम मिरवणुकीस परवानगी नाही
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मुस्लीम बांधवांचा मोहरम सण साजरा करण्यासंदर्भात राज्य सरकारच्या गृह खात्याने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.  कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी इतर सणांसारखेच मोहरमही साध्या पद्धतीने पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी असल्यामुळे मातम मिरवणूकीला परवानगी देण्यात आलेली नाही .

मोहरमसाठी शासनाने सांगितलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, कोरोना काळात पार पडलेल्या इतर धार्मिक कार्यक्रमांप्रमाणे मोहरम देखील आपापल्या घरात राहून दुखवटा पाळण्यात यावा, केंद्र व राज्य शासनाकडून सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी असल्यामुळे सार्वजनिक मातम मिरवणुकीला परवानगी देता येणार नाही. खाजगी मातम देखील शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करुन घरीच करावेत. सोसायटीमधील नागरिकांनी देखील एकत्रित मातम/दुखवटा मिरवणूक काढू नये .

वाझ/मजलीस – हे कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करुन ऑनलाईन पद्धतीने आयोजित करावे.

ताजिया/आलम- ताजिया/आलम काढण्यास परवानगी देता येणार नाही. ताजिया/आलम घरीच/घराशेजारी बसवून तेथेच शांत/ विसर्जन करण्यात यावेत.

सबील/छबील – सबील/छबील बांधण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी. त्या ठिकाणी दोन पेक्षा जास्त व्यक्तींनी उपस्थित राहू नये. याठिकाणी बंद बाटलीनेच पाण्याचे वाटप करण्यात यावे. सबीलच्या ठिकाणी स्वच्छता राखावी व सोशल डिस्टन्सींगचे पालन करण्यात यावे. कोणत्याही कार्यक्रमात चारपेक्षा अधिक व्यक्तींना परवानगी राहणार नाही. यादिवशी रक्तदान शिबिरे, प्लाज्मा शिबिरे , आरोग्य शिबिरे असे उपक्रम राबविण्यात यावेत व या उपक्रमांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात यावी. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष मोहरम सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे, असे या नियमावलीत म्हटले आहे.



हेही वाचा -

मुंबईतील अनेक रुग्णालयं होणार नॉनकोविड

मुंबईत ऑगस्टमध्ये मलेरियाचे ५९२ रुग्ण




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा