Advertisement

गणेशोत्सव २०१९: २०० विद्यार्थ्यांचं ध्वजपथक ‘असा’ उभारणार शाळेसाठी निधी

आपल्या मराठी माध्यमाच्या शाळेसाठी आर्थिक निधी कसा उभारता येईल, याबाबत डी. एस. हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये चर्चा सुरू असताना शाळेचं स्वत: चं ध्वजपथक असावं ही संकल्पना पुढं आली. ७ महिन्यानंतर हे स्वप्न पूर्ण झालं आहे.

गणेशोत्सव २०१९: २०० विद्यार्थ्यांचं ध्वजपथक ‘असा’ उभारणार शाळेसाठी निधी
SHARES

सायन येथील शिव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलमधील माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेलं 'धश्रीयन ध्वजपथक' गणरायाचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालं आहे. ढोल-ताशाचा कडकडाटात बाप्पाचं स्वागत करतानाच हे ध्वजपथक शाळेसाठी निधीही जमवणार आहे. या कार्यात शाळेतील आठवी-नववीतील ४० विद्यार्थ्यांचा देखील हातभार लागणार आहे. 


‘अशी’ सुचली कल्पना

आपल्या मराठी माध्यमाच्या शाळेसाठी आर्थिक निधी कसा उभारता येईल, याबाबत डी. एस. हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये चर्चा सुरू असताना शाळेचं स्वत: चं ध्वजपथक असावं ही संकल्पना पुढं आली. त्यानुसार, "शाळेचे माजी विद्यार्थी मिलिंद विचारे यांच्या वंदन ध्वजपथकाच्या सहकार्याने शाळेचे १५ माजी विद्यार्थी आणि ४० विद्यमान विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली.  

ध्वजपथकात सहभागी होण्याची अनेक वर्षांपासून इच्छा होती. शाळेच्या ध्वजपथकामुळे ढोल-ताशे वाजवण्याची ही इच्छा पूर्ण झाली. गेल्या ७ महिन्यांचा प्रशिक्षणाचा हा काळ म्हणजे खरोखरच एक अविस्मरणीय अनुभव होता. 

- चित्रा भोरे, रिया सकपाळ, इयत्ता नववीतील विद्यार्थिनी

तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सराव 

मागील ७ महिने दर आठवड्यातून एकदा भेटून, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सराव करून शालेय विद्यार्थ्यांचं धश्रीयन ध्वजपथक कसलेल्या वादकांना टक्कर देण्यासाठी सज्ज झालं आहे.  


२०० हून अधिक विद्यार्थी

या ध्वजपथकात २४ ढोल, पाच मोठे तर ३० लहान ध्वज असणार आहेत. याशिवाय, १५० विद्यार्थ्यांचं पारंपरिक झांज-लेझीम पथकही गणरायाच्या आगमनाचा आनंद द्विगुणित करणार असल्याची माहिती डी. एस. हायस्कूलचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी दिली. शाळेतील गणेशोत्सवाचं हे ८० वं वर्ष असून शनिवारी ३१ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता एकूण मिळून २००हून अधिक विद्यार्थी ढोलताशांच्या गजरात गणरायाचं स्वागत करणार आहेत, असंही प्रधान यांनी सांगितलं.

ही फक्त सुरुवात आहे. आणखी वर्षभर हे प्रशिक्षण चालेल. त्यानंतर विविध सण-उत्सव-मिरवणुकीच्या व्यावसायिक 'सुपाऱ्या' घेऊन जो निधी जमा होईल, तो शाळेच्या भविष्यवेधी उपक्रमांना देणार आहोत.

- मिलिंद विचारे, विशाल दवंडे, वैशाली गीते, संजय खंदारे, शाळेचे माजी विद्यार्थी  


 अथक परिश्रम

"ढोलताशे प्रशिक्षणाचा पहिला टप्पा शाळेच्या सभागृहात पार पडला. फेब्रुवारी ते मे या ४ महिन्यांत विद्यार्थ्यांनी ढोल-ताशा वाजवण्याचं बेसिक प्रशिक्षण घेतलं. दुसऱ्या टप्प्यात जून ते सप्टेंबरमध्ये वाशी येथील एपीएमसी मार्केटमधील एका शेडमध्ये सर्व विद्यार्थी जमून ढोल-ताशे वाजवायला शिकले. गेल्या ७ महिन्यांतला प्रशिक्षण वर्गाचा एकही रविवार विद्यार्थ्यांनी चुकवला नाही", अशी माहिती विद्यार्थ्यांना ढोलताशे वाजवण्याचे प्रशिक्षण देणारे मिलिंद  विचारे यांनी दिली.

 


हेही वाचा- 

गणेशोत्सव २०१९: मुंबई पोलिसांना मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान!

गणेशोत्सव २०१९: मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या १४ हजारांपलिकडेसंबंधित विषय
Advertisement