SHARE

'मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशन'च्या स्पर्धेत एअर इंडिया अंडर-19 संघाने सलग तिसऱ्या वर्षी 'सुपर डिव्हिजन' जिंकून विजयाची हॅट्रिक पूर्ण केली आहे. हा सामना शुक्रवारी परळ येथील झेवियर्स मैदानावर खेळवण्यात आला. मुंबई स्ट्रायकर्स विरुद्ध 5-0 च्या मोठ्या फरकाने विजय मिळवणाऱ्या एअर इंडियाच्या युवा खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली.

एअर इंडियाच्या डिंगकू शर्माने केलेल्या 4 गोलमुळे संघाने शानदार विजय मिळवला. तर सुमेश नायरने एक गोल केला. डिंगकूने 15 व्या मिनिटाला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 36 व्या मिनिटाला गोल करत संघाला 2-0 स्कोअरवर नेले. सुमेशने 47 व्या मिनिटाला गोल करत आघाडी 3-0 वर नेली. शेवटच्या फेरीत अंतिम पाच मिनिटांत डिंगकूने दोन गोल करत संघाला सहज विजय मिळवून दिला.

अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या मुंबई एफसी विरुद्ध सेंच्युरी रेयन संघातील लढत बरोबरीत सुटली. दोन्ही संघांनी एकमेकांवर 2-2 गोल नोंदवून बरोबरी साधली. सेंच्युरी संघाच्या सागर बेडेकरने दोन गोल केले, तर मुंबईच्या सोहेल खत्री आणि जोएल डायसने गोल नोंदवून संघाला पराभूत होण्यापासून वाचवले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या