Advertisement

'टूथब्रश'वर फुटबॉल फिरवून मोहनीशचा विश्वविक्रम


SHARES

भारतात भलेही क्रिकेट लोकप्रियतेच्या बाबतीत पहिल्या क्रमांकाचा खेळ असला, तरी फुटबॉलचे वेड असलेले चाहते इथेही कमी नाहीत. रशियात पार पडलेल्या कॉन्फडेरेशन चषक फुटबॉल स्पर्धेच्या मॅचेस रात्रभर जागून पाहिल्याची कित्येक उदाहरणे आपल्या आजूबाजूला आढळतील.


रोनाल्डोचा चाहता

सध्याच्या घडीला फुटबॉलच्या अवकाशातील दोन अढळ तारे म्हणजे लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तीयानो रोनाल्डो. या दोघांचे लाखो चाहते देशभरात विखुरलेले आहेत. यापैकीच एक म्हणजे मुंबईकर मोहनीश निकम.



एकलव्यासारखी मेहनत

रोनाल्डोच्या जादुई खेळाने इतर फुटबॉलप्रेमींप्रमाणे मोहनीशवरही गारुड केले. पण इतर चाहते आणि मोहनीशमधला वेगळेपणा हाच की रोनाल्डोला गुरूस्थानी मानत त्याने फ्रि स्टाईल फुटबॉलमध्ये प्रभूत्व मिळवून एका अनोख्या जागतिक विक्रमालाही गवसणी घातली.

भांडुप येथे राहणाऱ्या मोहनीशने एकलव्यासारखी खडतर तपश्चर्या करत फुटबॉल फ्रि स्टाईल प्रकारात प्राविण्य मिळवले. या प्रकारात तो इतका तरबेज झाला की त्याने चक्क 'टूथ ब्रश'वर 46.20 सेकंद फुटबॉल फिरवून 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये आपले नाव नोंदवले आहे.




मला लहानपणापासूनच फुटबॉलची आवड आहे. परंतु या खेळाचे व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी एखाद्या फुटबॉल अकादमीत नाव नोंदवण्यासाठी आर्थिक पाठबळ नव्हते. त्यामुळे टीव्ही, यु ट्युबवर फुटबॉलच्या मॅच पाहूनच मी घराच्या आजूबाजूला सराव सुरू केला. रोनाल्डो हा माझा आवडता फुटबॉलपटू असल्याने त्याचा खेळ न्याहाळून फ्रि स्टाईलमध्ये पारंगत झालो. नेहमीच काहीतरी वेगळे करावे, असे वाटत असल्याने मी 'टूथब्रश'वर फुटबॉल फिरवण्याचा प्रयत्न करू लागलो. त्यातूनच हा विक्रम घडला.
- मोहनीश निकम, फुटबॉलपटू


याआधीचा विश्वविक्रम

यापूर्वी हा विक्रम दिपांशू मिश्रा याच्या नावावर होता. त्याने फुटबॉल 42.92 सेकंद टूथब्रशवर फिरवून हा विक्रम रचला होता. केवळ फ्रि स्टाईलमध्येच नव्हे, तर मोहनीशने व्यावसायिक फुटबॉल स्पर्धेतही आपली दखल घ्यायला सर्वांना भाग पाडले. इंडियन सुपर लीग स्पर्धेत त्याने चमकदार कामगिरी केली आहे.


उदयोन्मुख खेळाडूंना मार्गदर्शन

मोहनीश सध्या त्याचे ग्रॅज्युएशन पूर्ण करत आहे. सोबत त्याने 'दि आर्ट ऑफ फुटबॉल फ्रि स्टाइल' अकादमी सुरू केली आहे. या मार्फत तो उदयोन्मुख खेळाडूंची टीम बनवत आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर फुटबॉलमध्ये भारताचे नाव मोठे करण्याची मनिषा त्याने बाळगली आहे. खेळ आणि राजकारण या गोष्टी वेगळ्या केल्यास फुटबॉलमध्ये भारताचा दर्जा उंचावेल, अशी अपेक्षा मोहनीशने व्यक्त केली अाहे.

शहरात काही ठिकाणीमोकळ्या मैदानांचा चक्क पार्किंगसाठी वापर करण्यात येत आहे. ते पाहता मोहनीशची अपेक्षा कितपत खरी ठरते, हे बघावे लागेल.

कुठलेही व्यावसायिक प्रशिक्षण न घेता मोहनीशने अथक सराव करून 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये आपले नाव कोरले. आता त्याला स्वतःचाच विश्वविक्रम मोडायचा आहे. त्यासाठी 'मुंबई लाइव्ह'कडून त्याला खूप खूपच शुभेच्छा.



हे देखील पाहा- या आधी कुणाच्या नावावर होता विश्वविक्रम

http://www.guinnessworldrecords.com/news/2017/6/video-indian-man-breaks-record-spinning-a-basketball-on-a-toothbrush-478837



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)  

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा