फ्लिटफूटर्स स्पोर्टस क्लबने पटकावले बोरीवली फुटबाॅल लीगचे जेतेपद


SHARE

गतविजेत्या फ्लिटफूटर्स स्पोर्टस क्लबने अाणखी एका शानदार कामगिरीचे प्रदर्शन करत बोरीवली प्रीमिअर फुटबाॅल लीगचे (बीपीएफएल) जेतेपद अापल्याकडेच राखले. मिलान क्लबविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात फ्लिटफूटर्सने संपूर्ण सामन्यावर वर्चस्व राखले अाणि दोन्ही सत्रात प्रत्येकी एक गोल करत २-० अशा फरकासह जेतेपदाला गवसणी घातली. बोरीवली स्पोर्टस फाऊंडेशनतर्फे एमडीएफएच्या अधिपत्याखाली बोरीवली पश्चिमेतील सेंट फ्रान्सिस डीअसिसी हायस्कूलच्या ग्राऊंडवर रंगलेल्या या अंतिम सामन्यात फ्लिटफूटर्सने अात्मविश्वासाने खेळ करत अापल्या प्रतिस्पर्ध्याला वरचढ होण्याची कोणतीही संधी दिली नाही अाणि सलग दुसऱ्यांदा जेतेपद पटकावले.


३३व्या मिनिटाला खाते खोलले

फ्लिटफूटर्सने सुरुवातीपासूनच अाक्रमक चाली रचल्या, त्याचे फळ त्यांना ३३व्या मिनिटाला मिळाले. स्ट्रायकर निशांत शेट्टीने सुरेखपणे गोल झळकावत अापल्या संघाला १-० अशी अाघाडी मिळवून दिली. मध्यंतरानंतर मिलान क्लबच्या खेळाडूंनी बरोबरी मिळवण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. पण प्रतिस्पर्ध्यांच्या बचावफळीसमोर त्यांना यश मिळाले नाही. अतिरिक्त वेळेत ग्रेनविले मर्झेलो याने दुसरा गोल करत फ्लिटफूटर्सच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.


मेरीलँड यूनायटेड तिसऱ्या स्थानी

तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात मेरीलँड यूनायटेडने एनडी२ साॅकर स्टार्झ संघाचा ३-० असा पाडाव करत बाजी मारली. केल्विन परेरा, ब्रेंडन डिमेलो अाणि ख्रिस्तोफर फर्नांडेस हे मेरीलँड युनायटेडच्या विजयाचे शिल्पकार ठरले. साॅकर स्टार्झच्या धुवल वाघेलाने गोल्डन बूट तर फ्लिटफूटर्सच्या तुषार पुजारीने स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला. चॅलेंजर एफसीचा विवेक तिवारी सर्वोत्तम गोलकीपर, फ्लिटफूटर्सचा निशांत शेट्टी सर्वोत्तम बचावपटू अाणि मिलान क्लबचा अमेय भटकळने सर्वोत्तम अाघाडीवीराचा पुरस्कार पटकावला.


हेही वाचा -

बोरीवली फुटबाॅल लीगमध्ये गतविजेत्या फ्लिट फूटर्सची विजयी सुरुवात

संबंधित विषय
ताज्या बातम्या