Advertisement

धक्कादायक! फेरपडताळणीत मुंबईसह राज्यात १३२८ आणखी कोरोनामृत्यू

राज्य सरकारने केलेल्या फेरपडताळणीत मुंबईसह राज्यभरात १३२८ आणखी कोरोनामृत्यू आढळून आले आहेत. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा वाढून आता ५४५६ इतका झाला आहे.

धक्कादायक! फेरपडताळणीत मुंबईसह राज्यात १३२८ आणखी कोरोनामृत्यू
SHARES

राज्य सरकारने केलेल्या फेरपडताळणीत मुंबईसह राज्यभरात १३२८ आणखी कोरोनामृत्यू (1328 additional corona death registered in maharashtra after re verification) आढळून आले आहेत. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा वाढून आता ५४५६ इतका झाला आहे. कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या नोंदी कमी संख्येने दाखविण्यात आल्याबद्दल विरोधकांकडून सातत्याने प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. 

सद्यस्थिती

राज्यात १५ जून २०२० पर्यंत १ लाख १० हजार ७४४ कोविड पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद झालेली आहे. त्यापैकी ५० हजार ५५४ ॲक्टीव्ह रुग्ण असून ५६ हजार ०४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ४ हजार १२८ कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. परंतु राज्य शासनाने फेरतपासणी केल्यानंतर मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आणखीन ८६२ कोरोनाबाधितांचे मृत्यू आढळून आले आहेत. तर राज्यातील उर्वरीत भागांत आणखी ४६६ कोरोनाबधित मृत्यू आढळले आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये मृत्युसमयी कोविड अहवाल पॉझिटीव्ह आला होता व या सर्व प्रकरणांची नोंद डेथ इन कोविड पॉझिटीव्ह म्हणून घेण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. यामुळे राज्यातील काेरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ५४५६ झाला आहे.

हेही वाचा - मिरा-भाईंदरमध्ये दोन नवीन कोरोना रुग्णालय, ८१९ पदांची भरती

वाढीव मृत्यूची नाेंद 

अहमदनगर १, अकोला १४, अमरावती ६, औरंगाबाद ३३, बुलढाणा २, धुळे १२, जळगाव ३४, जालना ४, लातूर ३, नांदेड २, नाशिक २८, उस्मानाबाद ३, पालघर ११, परभणी १, पुणे ८५, रायगड १४, रत्नागिरी १, सांगली ४, सातारा ६, सिंधुदूर्ग ३, सोलापूर ५१, ठाणे १४६, वाशिम १, यवतमाळ १ अशी एकूण ४६६.

समयोजनाच्या सूचना

याबाबत राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सविस्तर माहिती देताना सांगितलं की, जागतिक आरोग्य संघटना, आयसीएमआर तसंच नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (NCDC) यांनी ठरवून दिलेल्या ICD-10 मार्गदर्शक तत्वांनुसार कोविड बाधित मृत्यू प्रकरणांची कार्यवाही केली जाते. त्याचे पालन करणं बंधनकारक आहे, या आधारे तसंच राज्य शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे मार्च, २०२० पासून कोविड-१९ प्रकरणाची पडताळणी करण्यात येत असून त्यानुसार समायोजन करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आलेली आहे. ११ जून रोजी राज्य शासनाने जिल्हा यंत्रणांना समायोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

कोविड-१९ रुग्णासंदर्भातील माहिती विविध जिल्ह्यातील रुग्णालयांमधून पोर्टलवर भरण्यात येते. राज्य शासन या माहितीची स्वत:हून फेरतपासणी करते. समायोजन केलेली माहिती ही वेबपोर्टलवर सार्वजनिक केली जाते. त्यामुळे आकडेवारीत वाढ दिसली तरी हेतूबाबत शंका घेण्याचे कारण असू नये, असं राज्य शासनाने स्पष्ट केलं आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा