Advertisement

२२ टक्के भारतीय प्रौढांना मलावरोधाची समस्या!

अॅबॉट औषध उत्पादन कंपनीने केलेल्या राष्ट्रीय पातळीवर सर्वेक्षणात केवळ प्रौढांनाच नाही, तर तरुण-तरुणींनाही मलावरोधाचा आजार असल्याचं निदर्शनास आलं आहे.

२२ टक्के भारतीय प्रौढांना मलावरोधाची समस्या!
SHARES

भारतातील २२ टक्के तरुण-तरुणींना मलावरोधाची समस्या असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. अॅबॉट औषध उत्पादन कंपनीने केलेल्या राष्ट्रीय पातळीवर सर्वेक्षणात केवळ प्रौढांनाच नाही, तर तरुण-तरुणींनाही मलावरोधाचा आजार असल्याचं निदर्शनास आलं आहे.

या सर्व्हेक्षणात मुंबईसह दिल्ली, कोलकाता, हैदराबाद, चैन्नई, पाटणा, अहमदाबाद आणि लखनौ या शहरांत मलावरोध या आजाराचं निरीक्षण करण्यात आलं.

या सर्व्हेक्षणातून २२ टक्के प्रौढांपैकी १३ टक्के पौढांना गंभीर मलावरोध असल्याचं पुढे आलं आहे. भारतीय लोकसंख्येच्या जवळपास ६ टक्के प्रौढ मलावरोधाने त्रस्त असतात.


का होतो मलावरोध?

विविध मेटाबोलिक आजारांमुळे मलावरोध होऊ शकतो. बिगर मधुमेही रुग्णांच्या तुलनेत मधुमेह असणाऱ्यांना मलावरोधाचा त्रास होण्याची शक्यता २.२ पट अधिक असते. तर हायपोथायरॉइडियम असलेल्या रुग्णांना मलावरोधाचा त्रास होण्याची शक्यता २.४ पट अधिक असते.

महिलांमध्ये गर्भावस्था हे मलावरोधाच्या प्रमुख कारणांपैकी एक कारण असून ४ पैकी एका गर्भवती महिलेला २५ टक्के मलावरोध होतो.


खाण्याच्या अनियमित सवयी

जंक फूडचं सेवन, पाण्याचं कमी सेवन या मलावरोधाला कारण ठरणाऱ्या प्रमुख गोष्टी आहेत. २१ टक्के लोकांना शरीराची हालचाल न केल्यामुळे मलावरोधाचा त्रास होतो.

मलावरोधाचा त्रास असणाऱ्यांपैकी ३३ टक्के लोकांनी कधीही त्यावर उपचार घेतले नसून ४८ टक्के लोकांनी उपचारांसाठी घरगुती उपाय केल्याचंही सर्वेक्षणात दिसून आलं आहे. खरंतर, निरोगी मलमार्ग असणे हे अत्यंत महत्त्वाचं असतं. कारण, त्यामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती मजबूत होते.


कोलकाता पहिल्या क्रमांकावर

कोलकाता मलावरोधाने त्रस्त असणाऱ्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. या सर्वेक्षणातून पुढे आलेल्या आकडेवारीत २८ टक्के लोक मलावरोधाच्या आजाराने ग्रस्त आहेत. कोलकातातील रहिवासी शारीरिक हालचाली करण्यात मागे असून डॉक्टरांकडे जाण्याऐवजी स्वत:हून औषधं घेणं पसंत करतात. तर, दिल्लीत २३ टक्के लोकांना जंकफूडमुळे मलावरोधाचा त्रास होतो.


आरोग्यपूर्ण जीवनशैली, योग्य खाद्यपदार्थ, शारीरिक व्यायाम, भरपूर पाणी अशा चांगल्या सवयींमुळे शरीर हायड्रेट होण्यास मदत होते. त्यामुळे मलावरोध पूर्णपणे टाळता येईल. पण, ही समस्या झालीच तर लवकर उपचार केले पाहिजेत.
- डॉ. कुशल मित्तल, कोलोप्रोक्टोलॉजिस्ट

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा