Advertisement

Coronavirus Updates: कस्तुरबा रुग्णालयात तपासणीसाठी 'इतक्या' जणांनी लावली हजेरी

कोरोनाच्या तपासणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात सुविधा असल्यानं या रुग्णालयाबाहेर रुग्ण मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.

Coronavirus Updates: कस्तुरबा रुग्णालयात तपासणीसाठी 'इतक्या' जणांनी लावली हजेरी
SHARES

जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या धास्तीमुळं मुंबईतील अनेक रहिवाशी आता खबरदारी घेत आहेत. सर्दी, खोकला, ताप असल्यास तातडीनं कोरोनाची तपासणी करत आहेत. कोरोनाच्या तपासणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात सुविधा असल्यानं या रुग्णालयाबाहेर रुग्ण मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. दररोज कस्तुरबा रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात शेकडो रुग्ण करोनाच्या तपासणीसाठी हजेरी लावत आहे.

महापालिकेच्या नायर, केईएम आणि लोकमान्य टिळक रुग्णालयातील १८ डॉक्टरांची इथं नियुक्ती केली आहे. आतापर्यंत २२४७ जणांनी कस्तुरबा रुग्णालयात तपासणीसाठी हजेरी लावली. मंगळवारी १३० जणांच्या तपासण्या करण्यात आल्या. मुंबईमधील करोनाबाधितांची संख्या हळूहळू वाढत असून कस्तुरबा रुग्णालयात दाखल असलेल्या करोनाबाधित रुग्णाचा मंगळवारी मृत्यू झाला.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं मुंबईकर धास्तावले असून, करोनाची बाधा झाल्याचा संशय असलेल्यांच्या कस्तुरबा रुग्णालयात चाचण्या करण्यात येत आहेत. मुंबईत करोनाच्या तपासणीसाठी बाधित देशातून प्रवास करून आलेले आणि लक्षणे आढळलेले अनेक रुग्ण कस्तुरबात गर्दी करत आहेत.

या रुग्णांसोबतच सर्दी, ताप, खोकल्याचा संसर्ग झालेले रुग्णही करोनाचा संसर्ग झाला असेल या भीतीनं तपासणीसाठी येत आहेत. त्यामुळं सकाळपासूनच बाह्यरुग्ण विभागाबाहेर रांगा लागत आहेत. संपूर्ण बाह्यरुग्ण विभागाची जबाबदारी ३ डॉक्टरांवर होती. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालणाऱ्या या विभागामध्ये डॉक्टरांची संख्याही वाढविली आहे.

करोनाबाधितांसाठी अलगीकरण, तर संशयितांना विलगीकरण करण्याची व्यवस्थाही पालिकेकडून करण्यात आली आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेनंही कंबर कसली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी, तसेच आरोग्य स्वयंसेविका घरोघरी जाऊन नागरिकांशी करोनाविषयी संवाद साधत आहेत. करोनाची बाधा होऊ नये यासाठी काय करावे आणि काय करू नये याविषयी नागरिकांना मार्गदर्शन करीत आहेत.



हेही वाचा -

Coronavirus Updates: रेल्वे प्रवाशांचं स्क्रीनिंग करण्यासाठी राज्य सरकारची रेल्वेला विनंती

Coronavirus: अतिरिक्त भाडे घेणाऱ्या खाजगी बसेसवर होणार कारवाई - अनिल परब



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा