Advertisement

हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात सुरू

राज्यात जिल्हा रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, खासगी रुग्णालये या ठिकाणी हवेतून ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणारी प्रणाली (पीएसए) बसविण्यात येत आहे.

हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात सुरू
SHARES

ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न केले जात आहेत. राज्यात जिल्हा रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, खासगी रुग्णालये या ठिकाणी हवेतून ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणारी प्रणाली (पीएसए) बसविण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे ३८ पीएसए प्लांट राज्यात सुरू झाले असून त्याद्वारे दिवसाला सुमारे ५३ मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मिती होत आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

गरज वाढली

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राज्यात दररोज १२५० मेट्रीक टन ऑक्सिजन उत्पादीत होत असून मागणी मात्र १७५० मेट्रीक टन एवढी वाढली आहे. ती भरून काढण्यासाठी अन्य राज्यांमधून ऑक्सिजन आणतानाच स्थानिक पातळीवरच ऑक्सिजन निर्मिती व्हावी यासाठी हवेतून ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणाऱ्या तंत्रज्ञानाच्या आधारावर प्लांट सुरू करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

हेही वाचा- BARC करणार मुंबईला ऑक्सिजनचा पुरवठा

१५० प्लांटसाठी आॅर्डर

ऑक्सिजनच्या बाबतीत राज्य स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून आतापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत १५० पीएसए प्लांटसाठी ऑर्डर देण्यात आली आहे. राज्यात अशा प्रकारे ३५० प्लांट बसविण्याचं नियोजन आहे. त्याद्वारे ५०० मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मितीचं उद्दिष्ट असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं.

‘या’ जिल्ह्यात प्रकल्प

राज्यात कार्यान्वित झालेले हे ३८ पीएसए प्रकल्प बुलढाणा, वाशीम, बीड, लोखंडी सावरगाव, हिंगोली, जालना,नांदेड, उस्मानाबाद, सिंधुदूर्ग, मुंबई, अलिबाग, रत्नागिरी, गोंदिया, अहमदनगर, शिरपूर, भुसावळ, नंदूरबार, शहादा, सातारा, पुणे, बुलढाणा, चिखली, खामगाव येथील जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, खासगी रुग्णालय याठिकाणी उभारण्यात आले आहेत.

वाशिम, सातारा, हिंगोली, अहमदनगर, भंडारा, अलिबाग, रत्नागिरी, बुलढाणा, उस्मानाबाद आणि सिंधुदूर्ग येथील जिल्हा रुग्णालयांमध्ये केंद्र शासनाच्या मदतीने हवेतील ऑक्सिजन शोषून तो शुद्ध करून रुग्णांना पुरविणारे पीएसए प्लांट बसविण्यात आले आहेत. वैद्यकीय ऑक्सिजनच्या वाढत्या मागणीमुळे जाणवणाऱ्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर ह्या प्रकल्पातील ऑक्सिजनचा वापर हा रुग्णांसाठी वरदान ठरणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

(38 PSA oxygen plants starts in maharashtra says rajesh tope)


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा