Advertisement

'या' रुग्णांसाठी मुंबईत ४ फिरती लसीकरण केंद्र

बृहन्मुंबई महानगरपालिका आणि व्हॅक्सिन ऑन व्हिल्स्, अमेरिकन इंडिया फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं ४ फिरते लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत.

'या' रुग्णांसाठी मुंबईत ४ फिरती लसीकरण केंद्र
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिका आणि व्हॅक्सिन ऑन व्हिल्स्, अमेरिकन इंडिया फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं ४ फिरते लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या हस्ते झेंडा दाखवून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांव्यतिरिक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी ड्राइव्ह इन लसीकरण, अंथरुणास खिळलेल्या नागरिकांचे त्यांच्या घरी जाऊन लसीकरण, गर्भवती महिलांचे लसीकरण असे वेगवेगळे उपक्रम हाती घेतल्यानंतर आता त्यापुढे जाऊन फिरते लसीकरण केंद्र (मोबाईल व्हॅक्सिनेशन युनिट) सुरू करण्यात आले आहेत.

यासाठी व्हॅक्सिन ऑन व्हिल्स आणि अमेरिकन इंडिया फाऊंडेशन यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेसमवेत भागीदारी केली आहे. इच्छा असूनही काही अपरिहार्य कारणांनी लसीकरण केंद्रावर येऊन लस घेऊ न शकणाऱ्या तसंच कोव्हिड संसर्गाची बाधा होण्याचा धोका असलेल्या दुर्लक्षित घटकांपर्यंत जाऊन त्यांचे लसीकरण करण्याचा उपक्रम या भागीदारीतून हाती घेण्यात आला आहे.

यामध्ये एचआयव्ही रुग्ण, नाईलाने देह विक्रय करुन उदरनिर्वाह करणाऱ्या महिला, तृतीयपंथी, बांधकाम कामगार, स्थलांतरित कामगार, रस्त्यावरील विक्रेते अशा विविध समाज घटकांपर्यंत पोहोचून, लसीकरणासाठी त्यांना आवश्यक असलेले सर्व निकष पूर्ण करून विनामूल्य लस देण्यात येणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेनं प्रशासकीय विभागनिहाय अशा घटकांची यादी तयार केली आहे. त्यासाठी मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्था, पदपथावरील विक्रेत्यांची राष्ट्रीय संघटना तसंच इतर संबंधित बिगर शासकीय संस्थांची मदत घेण्यात आली आहे.

प्रत्येक फिरत्या केंद्रामध्ये १ प्रशिक्षित डॉक्टर, २ परिचारिका, २ वैद्यकीय सहाय्यक, रुग्णवाहिका चालक उपलब्ध राहणार आहेत. त्यांना लॅपटॉप आणि वायफाय इंटरनेट सुविधा पुरवली जाणार आहे. जेणेकरून कोव्हिन संकेतस्थळावर नोंदणी करुन लसीकरणाची पुढील कार्यवाही करता येईल. आवश्यकतेनुसार अशा फिरत्या केंद्रांची संख्या देखील वाढवण्यात येणार आहे.

पहिल्या दिवशी महात्मा जोतिराव फुले मंडई परिसरातील पदपथावरील ५० विक्रेते आणि देह विक्रय करणाऱ्या २५ महिला यांचे लसीकरण करण्यात येत आहे. या लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यासाठी संबंधित मनुष्यबळाला प्रशिक्षण देखील दिलं जात आहे.

१२ ऑगस्टपासून यारितीनं लसीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये पदपथावरील विक्रेत्यांसाठी बोरिवली भागात पहिलं लसीकरण केंद्र तर मालवणी, मालाड, भांडुपमध्ये दुसरे केंद्र कार्यान्वित राहील. देहविक्री करणाऱ्या महिलांचं लसीकरण करण्यासाठी भांडुप-मुलुंडमध्ये तिसरं केंद्र तर ग्रँटरोड आणि कामाठीपुरा भागात चौथे केंद्र कार्यान्वित होईल.

अमेरिकन इंडिया फाऊंडेशनसह पदपथ विक्रेत्यांची राष्ट्रीय संघटना, वाय. आर. गायतोंडे सेंटर फॉर एड्स रिसर्च अँण्ड एज्युकेशन यांचा देखील या उपक्रमात सहभाग आणि योगदान आहे.



हेही वाचा

राज्यात डेल्टा प्लसचे आढळले ४५ रुग्ण

व्हॉट्सअॅपवरून 'असं' डाऊनलोड करा कोविड १९ वॅक्सिनचं सर्टिफिकेट

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा