Advertisement

सोशल मीडिया सोसवेना! ५ कोटी भारतीयांना मानसिक आजार


सोशल मीडिया सोसवेना! ५ कोटी भारतीयांना मानसिक आजार
SHARES

सोशल मीडिया आणि स्मार्टफोनमुळे कुटुंबातील माणसांचा एकमेकांशी संवाद तुटला आहे. परिणामी एकलकोंडेपणा वाढल्याने मानसिक विकारात वाढ होत असल्याची धक्कादायक बाब मुंबई महापालिकेने नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणातून पुढं आलं आहे. या सर्वेक्षणाद्वारे ७३ लाख नागरिकांमध्ये ३१ टक्के मानसिक रुग्ण म्हणजेच २२ लाखाहून अधिक नागरिक मानसिक विकारांनी त्रस्त असल्याचं आढळून आलं आहे. या आकड्याकडे पाहता येणाऱ्या काळात या मानसिक आजाराची झळ प्रत्येक कुटुंबाला बसल्याशिवाय राहणार नाही.


कसं ओळखायचं मानसिक रुग्णाला

आता हा आजार होतो कसा ? असा रुग्ण ट्रेन मध्ये माझ्या बाजूला बसला तर त्याला मी ओळखू शकतो का ? या आजाराची लक्षणे कोणती असतात ? असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनाला पडणं साहजिकच आहे. पण, हा आजार आपल्या मनाला झालेला असतो याची कल्पना बऱ्याच नागरिकांना नसते.



भारतात किती प्रमाण?

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, भारतामध्ये दर ५ महिलांपैकी १ महिला तर दर १२ पुरुषांपैकी १ पुरुष मानसिक आजाराला बळी पडत आहे. यावरून मानसिक आजाराच्या बाबतीत महिलांचं प्रमाण चिंताजनक असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे.

याविषयी अधिक माहिती देताना मानसशास्त्र आणि समुपदेशक तरनुम डोब्रियाल सांगतात, की, ''गेल्या १० वर्षांत कुटुंबातील माणसांचा एकमेकांशी संवाद तुटला आहे. याचं मुख्य कारण मोबाईल फोन आणि या फोनवर असलेला सोशल मीडिया आहे.''


शहरात काय स्थिती?

मुंबई ,दिल्ली पुणे यांसारख्या प्रगत शहरांतील तरुण २४ तासांपैकी ४ ते ५ तास मोबाईलचा वापर करतात. यामुळे त्यांचा मुख्य जगाशी संबंध तुटतो आणि ते एका आभासी जगात प्रवेश करतात. या आभासी जगामध्ये सर्वकाही आलबेल चालू असतं व अचानक या आभासी जगामध्ये तुमच्या भावना अथवा इगो दुखावला गेला तर तुम्हाला मानसिक आजार होण्याची दाट शक्यता असते. दारू ,सिगारेट अथवा अंमली पदार्थांची नशा चढते, तसा प्रकार आता सोशल मीडियाबाबत झाला आहे.



कोवळ्या वयात परिणाम

वयाच्या दहाव्या वर्षी मी कसा दिसतो अथवा मी कशी दिसते यावर सोशल मीडियात २ ते ३ हजार लोकांकडून अभिप्राय मागवला जातो. या अभिप्रायावर त्या मुलाचा अथवा त्या मुलीचा मूड टिकून राहतो. जर या कोवळ्या वयात सोशल मीडियावर पालकांनी निर्बंध घातला नाही, अथवा योग्य सूचना दिल्या नाहीत तर त्यांचं मानसिक रुग्णामध्ये रूपांतर होण्यास जास्त वेळ लागणार नाही, अशी खंत देखील डोब्रियाल यांनी व्यक्त केली.

एखाद्या व्यक्तीला मानसिक आजार झाला आहे हे कसं ओळखायचं? याबाबत मिरा रोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमधील मनोविकारतज्ञ डॉ. सोनल आनंद यांनी काही मुद्दे सांगितले.


असं ओळखा मानसिक आजाराचं लक्षण

  • व्यक्तीची झोप बिघडणे,
  • भूक कमी होणे
  • चिडचिड वाढणे
  • एकलकोंडेपणा
  • दैनंदिन कामकाजात टाळाटाळ किंवा चुका
  • वजन खूप कमी होणं किंवा वाढणं
  • खूप भिती वाटणं
  • आत्मविश्वास कमी होणं
  • जीव घाबरणं
  • कामकाजाची इच्छा कमी होणं
  • आत्महत्येचा विचार येणं किंवा प्रयत्न करणं


लहान मुलांवर विपरित परिणाम

लहान मुलांच्या मनोविकारामध्ये प्रामुख्याने वर्तणुकीतील दोष किंवा विकृती, नैराश्य, अनामिक भीती इत्यादी लक्षणं दिसून येतात. विज्ञान असो अथवा तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्रासारखं आहे. तीन वर्षांच्या मुलाच्या हातात आपण मोबाईल देत आहोत. त्याच्या कोवळ्या डोळ्यावर आणि मेंदूवर काय विपरीत परिणाम होत असेल, याचा सुद्धा विचार आपण करत नाही. ऑफिसमध्ये काॅम्प्युटरचा वापर हा अनिवार्य आणि हिताचा आहे. पण, सोशल मीडियामध्ये व्हॉट्स अॅप,फेसबुक यावर तरुणांचा किती वेळ वाया जातो याची जाणीव त्यांना करून देणे महत्वाचं आहे, असं ही डॉ. सोनल आनंद सांगतात.


जगभरात ५० लाख लोकांचा मृत्यू

ब्रिटिश जर्नल ऑफ सायकिअॅट्रीमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार जगभरात दरवर्षी ५० लाख लोक मन: स्थितीतील बिघाड आणि चिंतेने ग्रासल्याने मरण पावतात. सध्या जगभरात ४५ कोटींपेक्षाही जास्त लोक मानसिक रोगी आहेत. त्याचप्रमाणे, ५ कोटी भारतीय अशा मानसिक अवस्थेशी लढत आहेत. २०२२ पर्यंत "नैराश्य" हा दुसरा सर्वात मोठा आजार असेल, अशी शक्यता नाकारता येणार नाही.



हेही वाचा-

मुंबईकरांनो, 'सोसल' तेवढंच वापरा सोशल मीडिया, नाहीतर वेडं व्हाल!

मुंबईकरांना मनोविकाराने पछाडलं



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा