Advertisement

टाटा रुग्णालयाचा अनोखा विक्रम, १२ वर्षांत केल्या ५ हजार फ्री फ्लॅप प्लास्टिक सर्जरी

टाटा मेमोरिअल रुग्णालयाने ५ हजार 'फ्री फ्लॅपरिकन्स्ट्रक्शन' (पुनर्बांधणी) शस्त्रक्रिया पूर्ण करून अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. मुंबईत ONCORECON- २०१८ या परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून या परिषदेतून प्लास्टिक सर्जरीचं महत्त्व विषद करण्यात येत आहे.

टाटा रुग्णालयाचा अनोखा विक्रम, १२ वर्षांत केल्या ५ हजार फ्री फ्लॅप प्लास्टिक सर्जरी
SHARES

प्लास्टिक सर्जरी... हा शब्द ऐकल्यास आपल्या डोळ्यापुढे सिनेमातील नट, नट्यांचा चेहरा येतो. कारण प्लास्टिक सर्जरीचा वापर केवळ सौंदर्य खुलवण्यासाठी केला जात असल्याचं आपल्या ऐकिवात असतं. या सर्जरीतून अनेक रुग्णांना जगण्याची प्रेरणा मिळत असल्याचं तुम्ही क्वचितच ऐकल असेल. मात्र मागील १२ वर्षांपासून हे काम करणाऱ्या परळच्या टाटा मेमोरिअल रुग्णालयाने ५ हजार 'फ्री फ्लॅपरिकन्स्ट्रक्शन' (पुनर्बांधणी) शस्त्रक्रिया पूर्ण करून अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. मुंबईत ONCORECON- २०१८ या परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून या परिषदेतून प्लास्टिक सर्जरीचं महत्त्व विषद करण्यात येत आहे.

या परिषदेत कर्करोगावरील उपचारानंतर करण्यात येणाऱ्या प्लास्टिक सर्जरीचं किती महत्त्व आहे? हे सांगणाऱ्या पुस्तकाचं देखील प्रकाशन करण्यात आलं. ‘मास्टरींग कॅन्सर रिकन्स्ट्रक्शन विथ फ्री फ्लॅप्स’ असं या पुस्तकाचं नाव आहे. या ३ दिवसीय परिषदेसाठी भारतभरातून जवळपास १५० ओनकोलॉजिस्ट उपस्थित आहेत. टाटा रुग्णालयातील प्लास्टिक सर्जरी विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. प्रभा यादव यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. कर्करुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये कर्करोगाच्या उपचारानंतर करण्यात येणाऱ्या प्लास्टिक सर्जरीचं महत्त्व काय? या विषयी डॉ. प्रभा यांनी या पुस्तकात लिखाण केलं आहे.



फ्री फ्लॅप रिकन्स्ट्रक्शन म्हणजे काय ?

कॅन्सरवर उपचार करताना, शरीरातील कॅन्सरग्रस्त अवयव शस्त्रक्रियेद्वारे शरीरापासून वेगळा करावा लागतो. त्या ठिकाणी होणारी जखम मोठी असेल आणि ती पूर्ववत बंद करणे अशक्य वाटत असेल, तर रुग्णावर पूर्वी शस्त्रक्रिया केली जात नव्हती. पण आता फ्री फ्लॅप रिकन्स्ट्रक्शन सर्जरीद्वारे रुग्णाच्या शरीरातील दुसऱ्या ठिकाणचं मांस, हाड, त्वचा काढून रक्तवाहिन्यांशी जोडून शस्त्रक्रिया केलेल्या ठिकाणी बसवला जातो. ही शस्त्रक्रिया गुंतागुंतीची आणि अतिशय नाजूक असते. ती पूर्ण होण्यास १० ते १२ तास लागतात.


नवा आत्मविश्वास, जीवन सुसह्य

एखाद्या महिलेला स्तनाचा कॅन्सर झाला तर अनेकदा स्तन काढावं लागतं. त्यामुळे तिच्या शरीरात असमतोल निर्माण होतो. कधी कधी दोन्ही स्तन काढावे लागतात. याचा परिणाम स्त्रीच्या मानसिकतेवरही होऊ शकतो. अशावेळी ती जखम भरून काढण्यासाठी आणि स्तनाची पुनर्बांधणी करण्यासाठी मांडीतील मांसपेशी काढून स्तनाच्या जागी तसा आकार देऊन जोडल्या जातात. जबड्याचा कॅन्सर झाल्यास जबडा काढून टाकावा लागतो. तेव्हा पायाच्या दोन हाडांपैकी एक हाड काढून त्याला जबड्याचा आकार देऊन तोंडात शस्त्रक्रियेद्वारे बसविले जाते आणि त्याच्यात कृत्रिम दात बसवले जातात. त्यामुळे तो रुग्ण खाऊ शकतो, अशा तऱ्हेने या प्लास्टिक सर्जरीद्वारे रुग्णाला नवा आत्मविश्वास मिळून त्यांच जीवन सुसह्य बनतं.


दातांचा, जीभेचा, घश्याचा, ओठ, त्वचा इ. बाह्य अवयवांचा कॅन्सर झाल्यावर तो भाग कापून काढावा लागतो. अशावेळी शारीरिक विद्रुपता तर येतेच पण कार्यक्षमतेवर आणि सहज जीवन जगण्यावर मर्यादा येतात. प्लास्टिक सर्जरीच्या माध्यमातून फ्री फ्लॅप रिकन्स्ट्रक्शन किंवा पुनर्बांधणी शस्त्रक्रियेने प्लास्टिक सर्जन्सनी यावर पण मात करण्यात यश मिळवले आहे. फ्री फ्लॅप रिकन्स्ट्रक्शन शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरच्या उपचारांत परिपूर्णता आणायला मदत होत आहे.

- डॉ. प्रभा यादव, प्रमुख, प्लास्टिक सर्जरी विभाग, टाटा कॅन्सर रुग्णालय



हेही वाचा-

आफ्रिकन महिलेच्या दुर्मिळ कर्करोगावर वोक्हार्टमध्ये उपचार


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा