Advertisement

मुंबईत स्वाईन फ्लूमध्ये अतीजोखमीचे 60 टक्के रुग्ण


मुंबईत स्वाईन फ्लूमध्ये अतीजोखमीचे 60 टक्के रुग्ण
SHARES

आतापर्यंत राज्यातील 418 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, मुंबईत आतापर्यंत स्वाईन फ्लूचे 413 रुग्ण आढळले आहेत. त्यातील 7 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील सर्वच रुग्णांना स्वाईन फ्लू झाला असेलच असं नाही. त्यातील जवळपास 60 टक्के रुग्ण हे अतिजोखमीचे म्हणजेच ह्रदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कर्करोग अशा आजारांनी त्रस्त असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे ते रुग्ण फक्त स्वाईन फ्लूमुळेच दगावले असं म्हणता येणार नसून हे अतिजोखमीचे आजारही त्यासाठी कारणीभूत ठरले असण्याची शक्यता आहे, असं आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी म्हटलं आहे.  

स्वाइन फ्ल्यू प्रतिबंधक उपचारासाठी राज्यातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणेने यापूर्वीच आवश्यक ती पाऊले उचलली आहेत. राज्यात 2199 ठिकाणी स्वाईन फ्लूच्या रुग्णांचे स्क्रिनिंग करणारे सेंटर्स सुरू करण्यात आले आहेत. त्यात आतापर्यंत 13 लाख 62 हजार रुग्णांचे स्क्रिनिंग देखील करण्यात आले आहे.

डॉ. दीपक सावंत, आरोग्यमंत्री, महाराष्ट्र

स्वाइन फ्ल्यूवरील ऑसेलटॅमिवीर औषध आणि इतर साधनसामुग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. अतिजोखमीच्या व्यक्तींसाठी ऐच्छिक आणि मोफत लसीकरण सुविधा शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिवाय दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीतील गरोदर मातांबरोबरच मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींना देखील ही लस देण्यात येत आहे. 16 ऑगस्टपर्यंत 32 हजार 416 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान स्वाईन फ्ल्यूचा आढावा घेणारी बैठक आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती. त्यावेळी स्वाईन फ्लूमुळे होणाऱ्या मृत्यूची निश्चिती करण्यासाठी प्रत्येक महापालिका क्षेत्रात ‘डेथ ऑडिट कमिटी’ स्थापन करण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले होते. त्या माध्यमातून मृत्यूच्या नेमक्या कारणांचा शोध घेणे शक्य होणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले होते.

राज्यभरात स्वाईन फ्ल्यू सदृश्य रुग्णांचे नियमित सर्वेक्षण करण्यात येत असून सर्व रुग्णांवर विनाविलंब उपचार करण्यात येत आहेत. फ्ल्यूचा प्रसार रोखण्यासाठी उपचार सुविधा असणाऱ्या खासगी रुग्णालयांना देखील स्वाईन फ्ल्यू उपचाराची मान्यता देण्यात आली आहे. स्वाईन फ्ल्यूला अटोक्यात ठेवण्यासाठी आरोग्य विभागामार्फत योग्य ती सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. अतिजोखमीच्या गटातील रुग्णांनी तसंच ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, गरोदर स्त्रिया यांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.



हेही वाचा

आमिर खान आणि किरण रावलाही झाला स्वाईन फ्लू


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा