Advertisement

'हे' तंत्रज्ञान ठेवतं हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर लक्ष

रुग्ण तोफझल हुसैन यांच्या हृदयात 'इंप्लांटेबल लूप रेकॉर्डर' बसवण्यात आलं आहे. त्याआधारे त्यांच्या हृदयाच्या ठोक्यांकडे सातत्याने लक्ष ठेवलं जाणार आहे.

'हे' तंत्रज्ञान ठेवतं हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर लक्ष
SHARES

आधुनिक तंत्रज्ञानाच्या जाेरावर बांग्लादेशी नागरीक तोफझल हुसैन यांना नवं जीवनदान मिळालं आहे. त्यांच्या हृदयात 'इंप्लांटेबल लूप रेकॉर्डर' बसवण्यात आला असून या रेकाॅर्डरच्या आधारे तोफझल हुसैन यांच्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्याची माहिती डाॅक्टरांना मिळणार आहे. अशा प्रकारची ही पहिलीच शस्त्रक्रिया आहे.

सन २०१० पासून हुसैन यांना सिंकोप(अचानक बेशुद्ध होणं आणि डोळ्यापुढे अंधारी येणं) चा त्रास सुरू होता. तपासणीत त्यांना हृदयाचा त्रास असल्याचं स्पष्ट झालं. पण, त्यांच्या या आजारावर बांग्लादेशात कुठल्याही प्रकारचे उपचार झाले नाहीत. म्हणून त्यांनी मुंबईतील नानावटी रुग्णालयात येऊन उपचार घेण्याचं ठरवलं.


मोबाईलवर मेसेज

नानावटीत दाखल झाल्यावर तोफझल हुसैन यांच्या हृदयात 'इंप्लांटेबल लूप रेकॉर्डर' बसवण्यात आलं. त्याआधारे त्यांच्या हृदयाच्या ठोक्यांकडे सातत्याने लक्ष ठेवलं जाणार आहे. इसीजीप्रमाणेच या तंत्रज्ञानानेही हृदयाच्या ठोक्यांवर लक्ष ठेवलं जातं. हृदयाचे ठोके व्यवस्थित नसतील तर, डॉक्टरांना त्यांच्या मोबाईलवर एक मेसेज मिळणार आहे. ज्यामुळे डॉक्टर हुसैन यांच्या हृदयाचे ठोके ऑनलाईनदेखील पाहू शकतील.


प्रत्येक ठाेक्यावर लक्ष

हुसैन यांना असलेल्या आजाराचं योग्य निदान होत नसल्याने डॉक्टरांसमोर त्यांना होणारा त्रास कसा कमी करायचा, हे एक आव्हान होतं. पण, नानावटीच्या डॉक्टरांनी त्यांच्या हृदयाच्या ठोक्यांवर लक्ष देण्याचं ठरवलं. हुसैन यांच्या हृदयाचे ठोके असामान्य असल्याचं डॉक्टरांना जाणवलं. त्यानुसार डॉक्टरांनी हुसैन यांच्या हृदयाच्या ठोक्यांवर दिवसरात्र लक्ष दिलं पाहिजे, असं मत नोंदवलं.


२४ तास अलर्ट

त्यासाठी डॉक्टरांनी हुसैन यांच्या शरीरात 'इंप्लांटेबल लूप रेकॉर्डर' बसवण्याचा सल्ला दिला. या तंत्रज्ञानाने हुसैन यांच्या हृदयाचे ठोके पुढील ३ वर्षे २४ तास डॉक्टरांना पाहता येणार आहेत.


'इंप्लांटेबल लूप रेकॉर्डर' एक अत्यंत छोटं यंत्र असतं. छातीच्या त्वचेखाली हे यंत्र बसवण्यात येतं. या यंत्रामुळे हुसैन बांग्लादेशमध्ये असतील तरीही, त्यांच्या हृदयाचे ठोके तपासता येतील, त्यावर लक्ष ठेवता येईल. सतत इसीजी घेत असल्याप्रमाणे हे उपकरण रूग्णाच्या हृदयाची लय रेकॉर्ड करेल आणि कोणत्याही असामान्य लयीला लगेच संबंधित डॉक्टरांकडे मोबाईल अलर्टच्या स्वरूपात पाठवेल आणि डॉक्टर ऑनलाइन स्वरूपात असामान्य लय बघू शकतील. या प्रकारच्या तंत्रामुळे आम्ही परशातील रूग्णांवर उपचार करण्यास सक्षम झालो आहोत.
- डॉ. सलील शिरोडकर, हृदयविकारतज्ज्ञ, नानावटी रुग्णालय

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा