Advertisement

७ लाखाहून अधिक नवी मुंबईकरांनी घेतला लसीचा पहिला डोस

नागरिकांना त्यांच्या घरापासून जवळच लस घेणे सुविधाजनक व्हावे याकरिता महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार सद्यस्थितीत 91 लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत.

७ लाखाहून अधिक नवी मुंबईकरांनी घेतला लसीचा पहिला डोस
SHARES

कोरोना लसीच्या उपलब्धतेनुसार जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करून त्यांना संरक्षित करण्यासाठी दैनंदिन लसीकरणाचे योग्य नियोजन करण्याकडे नवी मुंबई महापालिकेच्यावतीने लक्ष दिलं जात आहे. आतापर्यंत 7 लाखाहून अधिक नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे.

नागरिकांना त्यांच्या घरापासून जवळच लस घेणे सुविधाजनक व्हावे याकरिता महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार सद्यस्थितीत 91 लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. तसेच यापुढील काळात अधिक प्रमाणात लस उपलब्ध झाल्यास कोव्हीड लसीकरणाला वेग देण्यासाठी शंभरहून अधिक लसीकरण केंद्रे सुरू करण्याचे संपूर्ण नियोजन करण्यात आलेले आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेची लसीकरण केंद्रे व खाजगी रूग्णालयांतील केंद्रे याठिकाणी 7 लाख 1 हजार 939 नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर 2 लाख 37 हजार 513 नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. म्हणजेच एकूण 9 लाख 39 हजार 452 लसीचे डोस देण्यात आलेले आहेत.

कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेपूर्वी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे याकरिता नवी मुंबई महानगरपालिका प्रयत्नशील आहे. ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतलेला आहे त्यांना विहित कालावधीत दुसरा डोस उपलब्ध करून देण्याची काळजी घेतली जात आहे. तसंच 45 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य दिले जात आहे.

सध्या कोरोना रुग्णांची संख्या काहीशी कमी झाल्याने प्रतिबंधातून काही प्रमाणात सवलत देण्यात आली असली तरी त्या सवलतीचा कोरोना नियमांच्या चौकटीत राहूनच लाभ घ्यावा व नियमांचे उल्लंघन करून कोरोनाला निमंत्रण देऊ नये असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केलं आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा