Advertisement

७८ टक्के मुंबईकरांना बायको, मुलांसाठी सोडायचे आहे धूम्रपान...


७८ टक्के मुंबईकरांना बायको, मुलांसाठी सोडायचे आहे धूम्रपान...
SHARES

मुंबई, दिल्ली, बंगळुरू, लखनऊ आणि कोलकाता या देशातील पाच महत्त्वाच्या शहरांमध्ये ‘चूझ लाईफ’ नावाने धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले. धूम्रपानाच्या वाईट परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करणे, धूम्रपान सोडणाऱ्यांना त्यांच्या या प्रवासात मदत करणे यावर या अभ्यासात भर होता. या सर्वेक्षणात मुंबईत धूम्रपान करणाऱ्या १०० टक्क्यांपैकी ७८ टक्के व्यक्तींनी बायको, मुलांसाठी धूम्रपान सोडण्याचा प्रयत्न केला खरा, पण या व्यसनात ते इतके गुरफटलेत की त्यांना या प्रयत्नात अपयश आले.


सर्वेक्षणात यांची निवड

मुंबई, दिल्ली आणि बंगळुरूतील नामांकीत फुप्फुसविकार तज्ज्ञ तसेच चेस्ट फिजिशियन्स यांनी ‘चूझ लाईफ’ अभ्यासासाठी सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणासाठी २५ ते ५० वयोगटातील, अ आणि ब सामाजिक, आर्थिक वर्गातील १००० पुरुषांचा (५०० धूम्रपान करणारे, तर ५०० धूम्रपान न करणारे) समावेश करण्यात आला. दिवसातून १० सिगरेट्सपेक्षा अधिक सिगरेट्स ओढणाऱ्यांना या यादीत स्थान मिळाले.


१० पैकी ९ जण अयशस्वी

धूम्रपानाचे शरीरावर होणारे परिणाम माहित असूनही ते करणाऱ्यांपुढे सर्वात मोठे आव्हान असते, ते धूम्रपान सोडण्याचे. धूम्रपान करणाऱ्या १० व्यक्तींपैकी ९ जण धूम्रपान सोडण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना या प्रयत्नात यश येत नाही. त्यामुळे धूम्रपानाच्या आहारी न जाणेच किंवा सुरूवातीच्या टप्प्यातच या चक्रातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक सर्वेक्षणातून दिसून आले.


तीन महिन्यांतच पुन्हा व्यसन

या सर्वेक्षणांतर्गत डॅक्टरांनी धूम्रपान सोडण्याचा सल्ला दिल्यानंतर मुंबईतील धूम्रपान करणाऱ्यांपैकी सर्वाधिक लोकांनी (७८ टक्के) धूम्रपान सोडण्यासाठी प्रयत्न केले. पण त्यांना या प्रयत्नात यश आले नाही. यातील बहुतेक जणांनी मुलांसाठी किंवा पत्नीसाठी तसेच दोघांसाठीही धूम्रपान सोडण्याची इच्छा व्यक्त केली.

पण तीन महिन्यांतच ते पुन्हा सिगरेट ओढू लागले. धूम्रपान सोडणे अत्यंत कठीण असल्याचेच या अभ्यासावरून दिसले. महत्त्वाचे म्हणजे मुंबई, दिल्ली, बंगळुरू, लखनऊ आणि दिल्ली या सर्वच शहरातील आकृतीबंध (पॅटर्न) थोड्याफार फरकाने सारखाच आहे. अभ्यासात धूम्रपान सोडणे खूप कठीण आहे, असे कोलकत्यात धूम्रपान करणाऱ्यांपैकी ८० टक्के जणांना वाटले.



धूम्रपान सोडण्यातील आव्हाने अनेकविध आहेत म्हणूनच त्यात करण्यासारखेही बरेच आहे. भारतात धूम्रपान सोडण्याच्या शास्त्रीय पद्धतींना योग्य समुपदेशनाची जोड मिळणे आवश्यक आहे.
- डॉ. प्रशांत छाजेड, पल्मोनोलॉजिस्ट (फुप्फुसविकारतज्ज्ञ) फोर्टीस, नानावटी रुग्णालय


उच्च रक्तदाब, अती संवेदनशीलता

सर्वेक्षणात ज्या पुरूषांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यापैकी ६५ टक्के जणांना उच्च रक्तदाबाचा त्रास आढळून आला. तर ५ पैकी ४ जणांमध्ये कार्बन मोनॉक्साईडचे प्रमाण धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तीच्या तुलनेत अधिक आढळले. उच्च रक्तदाब आणि कार्बन मोनॉक्साईडचा वाढलेला स्तर यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर खूप गंभीर परिणाम होतात.



  • मुंबईतील धूम्रपान करणाऱ्यांपैकी ४७ टक्के लोक उच्च रक्तदाबाच्या विकारपूर्व अवस्थेत आढळले. (रक्तदाब: १२०- १३९ सिस्टॉलिक (हृदय स्नायूंच्या आकुंचनच्या वेळी) तर ८०-८९ डायस्टॉलिक (हृदय स्नायूंच्या प्रसरणाच्या वेळी)
  • बंगळुरूमधील १९ टक्के धूम्रपान करणाऱ्यांच्या चाचणीत ते उच्चरक्तदाब विकाराच्या दुसऱ्या टप्प्यात असल्याचे दिसले. (रक्तदाब- सिस्टॉलिक १६० किंवा त्याहून अधिक, डायस्टॉलिक १०० किंवा त्याहून अधिक.)
  • या धूम्रपान करणाऱ्यांपैकी ४५ टक्के जण १० सेकंदही श्वास रोखून धरू शकले नाहीत. तर धूम्रपान न करणारे १०० टक्के पुरुष १० सेकंद श्वास सहज रोखून धरू शकले.
  • सर्वेक्षणानुसार धूम्रपान करणारे व्यक्ती धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत २०० टक्के अती संवेदनशील असतात. तर तणावाला बळी पडण्याचे प्रमाणही त्यांच्यात धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तीच्या तुलनेत १७८ टक्के अधिक अाढळले.


अपुरी झोप, प्रेरणेचा अभाव

सतत झोपमोड होणे, अपुरी झोप, प्रेरणेचा अभाव, अती खाणे किंवा अत्यंत कमी खाणे, घरात किंवा कामाच्या ठिकाणी रागाचा उद्रेक अशा समस्याही धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये आढळल्या.

धूम्रपानाचे आरोग्यावर होणारे वाईट परिणाम माहित असूनही १० पैकी ८ जणांना झोपेतून उठल्या उठल्या धूम्रपानाची तीव्र इच्छा होते. तर ४ पैकी ३ जण आजारी असतानाही धूम्रपान करतात.



धूम्रपान करणाऱ्या बहुतेक लोकांना धूम्रपानाचे परिणाम किती गंभीर आहेत याची जाणीव असते, तरीही ते धूम्रपान करत राहतात. त्यांना वाटते की धूम्रपानामुळे त्यांच्यावरील ताण कमी होतो आणि त्यांची उत्पादनक्षमता वाढते. अर्थातच हे खरे नाही हे अभ्यासांती स्पष्ट झाले आहे. धूम्रपान करणारे लोक ते न करणाऱ्यांच्या तुलनेत मानसिक तणावाला अधिक बळी पडतात.
डॉ. प्रल्हाद प्रभूदेसाई, प्रमुख पल्मोनोलॉजिस्ट, लीलावती रुग्णालय


मजा म्हणून सुरूवात

सर्वेक्षणानुसार, धूम्रपान करणाऱ्यांपैकी सुमारे ८८ टक्के लोकांना ही सवय वयाच्या २४ वर्षांच्या आत लागली आणि ५५ टक्के लोकांनी धूम्रपानाला सुरुवात केवळ मजा म्हणून केली.
लखनऊमधील धूम्रपान करणाऱ्यांपैकी ३४ टक्के केवळ 'कूल' दिसण्यासाठी धूम्रपान करत असल्याचे पुढे आले. (हे प्रमाण लखनऊमध्ये अन्य शहरांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.)


धूम्रपान करणारे ही सवय सोडण्यासाठी खूप प्रयत्न करतात पण बहुतेकांना सिगरेटपासून दूर राहणे कठीण जाते. मग ते धूम्रपान करत राहतात, यात खूप वेळ घालवतात, त्यांच्या उत्पादनक्षमतेवरही परिणाम होतो. त्यामुळे हे केवळ वैयक्तिक आव्हान नाही, तर संस्थात्मक आव्हान आहे. शास्त्रशुद्ध पद्धतींचा अवलंब केल्यास धूम्रपान सोडण्याची प्रक्रिया सोपी होऊ शकते.
- डॉ. पार्थ प्रीतम बोस, प्रमुख चेस्ट फिजिशियन, नॅशनल हार्ट इन्स्टिट्यूट

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या आकडेवारीनुसार तंबाखूच्या सेवनाने भारतात दरवर्षी ९ लाख जणांचे प्राण जातात. तंबाखूमुळे होणाऱ्या आजारामुळे देशाला दरवर्षी १६ दशलक्ष डॉलर्सचा फटका बसतो. त्यामुळे धूम्रपानाची सवय जडलेल्या व्यक्तीचे हे व्यसन सोडविण्यासाठी जिकरीचे प्रयत्न होणे गरजेचे असून या वाटेला कुणीही जाऊ नये म्हणून जनजागृतीही अधिक प्रखरपणे होणे आवश्यक आहे.



हे देखील वाचा -

तंबाखू टाळा...आरोग्य सुधारा

तुमच्या फुफ्फुसांची काळजी घ्या



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा