Advertisement

“तर, राज्यात एप्रिलमध्ये कोविडचे ३ लाख अॅक्टिव्ह रूग्ण..”

कोरोनाबाधितांची संख्या अशीच वाढती राहिल्यास राज्यात एप्रिल पहिल्या आठवड्यात ३ लाख सक्रिय रुग्ण होऊ शकतात.

“तर, राज्यात एप्रिलमध्ये कोविडचे ३ लाख अॅक्टिव्ह रूग्ण..”
SHARES

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची (coronavirus) संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने १७ सप्टेंबर २०२० रोजी असलेल्या रुग्ण संख्येपेक्षा उच्चांकी संख्या गाठली आहे. ही संख्या अशीच वाढती राहिल्यास राज्यात एप्रिल पहिल्या आठवड्यात ३ लाख सक्रिय रुग्ण होऊ शकतात. त्यामुळे सर्वांनी प्राधान्याने आरोग्याचे नियम पाळणं आवश्यक आहे, असा इशारा आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी कोरोना लसीकरणासंदर्भात विभागीय आयुक्तांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी यावेळी सांगितलं की, आपण दिवसेंदिवस लसीकरणाचा वेग वाढवीत असून बुधवारी दिवसाला २ लाख ७५ हजार डोस  देण्यात आले. लवकरच आपण ३ लाख डोस दर दिवशी देऊ शकू. प्राधान्य गटात १.७७ कोटी जणांना दोन डोस  म्हणजे एकूण पहिल्या टप्प्यात ३.५ कोटी डोसची आवश्यकता आहे. अजून साधारणपणे ३ कोटी डोस द्यायचे आहेत. लसीकरण वेग वाढल्यानंतर ३ ते ४ महिन्यात ते पूर्ण होऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यात गुरूवारी २५८३३ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली व नवीन १२७६४ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण २१७५५६५ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण १६६३५३ अॅक्टिव्ह  रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ९०.७९% झालं आहे.

हेही वाचा- महाराष्ट्रात कोविड लसीचे दररोज ३ लाख डोस द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, राज्यात बहुतांश ठिकाणी तीव्र उन्हाळा असतो, त्याचा परिणाम कमी लसीकरणावर होऊ शकतो हे गृहीत धरून नागरिकांना दुपारच्या आत किंवा दुपारनंतर व उशिरा रात्री पर्यंत लस देण्याची व्यवस्था करावी तसंच ज्येष्ठ व सहव्याधी रुग्ण रांगांमध्ये उभे असतात त्यांची गैरसोय होणार नाही व कुठेही वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी, असे निर्देश दिले.

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या फिल्ड रुग्णालयांमध्ये रुग्ण वाढत आहेत. येणारा पावसाळा लक्षात घेऊन त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावं व आवश्यक ती देखभाल व दुरुस्ती करून घ्यावी; जेणेकरून पावसाचा त्रास होणार नाही अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.

आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी संसर्ग असो किंवा लसीकरण, दोघांच्या बाबतीत अधिक मोठ्या प्रमाणावर स्थानिक पातळीवर लोकांमध्ये जनजागृती करावी असं सांगितलं. राज्यात एकवेळ होती जेव्हा दिवसाला केवळ २ हजार रुग्ण येत होते. आता गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे, त्यादृष्टीने परत एकदा तात्पुरत्या व कंत्राटी स्वरूपात वैद्यकीय कर्मचारी व सहायक नियुक्त करा तसंच बेड्सची जादा संख्या कशी उपलब्ध राहील याचं नियोजन करण्याचं त्यांनी सांगितलं.

(active covid 19 patients might increase in maharashtra in april)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा