Advertisement

महापालिका रुग्णालयांत 'या' जखमी खेळाडूंवर मोफत उपचार

मुंबईमधील विविध खेळांमध्ये प्रावीण्य मिळविलेल्या खेळाडूंना खेळादरम्यान दुखापत झाल्यास महापालिका रुग्णालयांमध्ये मोफत वैद्यकीय उपचार करता येणार आहे.

महापालिका रुग्णालयांत 'या' जखमी खेळाडूंवर मोफत उपचार
SHARES

मुंबईतील जखमी खेळाडूंना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईमधील विविध खेळांमध्ये प्रावीण्य मिळविलेल्या खेळाडूंना खेळादरम्यान दुखापत झाल्यास महापालिका रुग्णालयांमध्ये मोफत वैद्यकीय उपचार करता येणार आहे. याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, असं आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आलं आहे.

कधी कधी सरावादरम्यान वा खेळाच्या सामन्यादरम्यान खेळाडू जायबंदी होतात. वेळप्रसंगी त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रियाही करावी लागते. त्यासाठी प्रचंड खर्च येतो. सर्वसामान्य कुटुंबातील खेळाडूंना हा खर्च परवडत नाही. त्यामुळं अशा खेळाडूंवर महापालिकेनं आपल्या रुग्णालयात मोफत उपचार करावेत, अशी मागणी करणारी ठरावाची सूचना शिवसेना नगरसेवक समाधान सरवणकर यांनी पालिका सभागृहात सादर केली होती.

ही ठरावाची सूचना एकमताने मंजूर होऊन महापालिका आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात आली होती. ठरावाच्या सूचनेवर पालिका आयुक्तांनी आपला अभिप्राय सादर केला असून खेळादरम्यान जायबंदी होणाऱ्या खेळाडूंवर पालिका रुग्णालयात उपचार करण्याबाबत आयुक्तांनी सकारात्मकता दर्शवली आहे.

मुंबईत क्रिकेट, कबड्डी, खो खो, बॅर्डंमटन, टेनिस, फुटबॉल इत्यादी विविध प्रकारचे खेळ खेळण्यात येतात. खेळ खेळताना खेळाडूंच्या हातापायाला, मानेला, पाठीच्या मणक्याला, नसांना, डोक्याला, कंबरेत कुठेही कमीअधिक प्रमाणात दुखापत होते. मात्र खासगी रुग्णालयात महागडे उपचार घेणे त्यांना परवडत नाही.

दुखापत खूपच मोठी असल्यास खेळाडू कायमचा जायबंदी होऊ शकतो. त्यामुळे त्याची कारकीर्द धोक्यात येण्याची शक्यता असते. तसेच संबंधित खेळाडू घरातील कर्ता पुरुष असल्यास त्याच्या व कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. महापालिकेने स्वत:हून मोफत वैद्यकीय मदतीचा हात पुढे केल्यास जखमी खेळाडूंना मोठा दिलासा मिळेल असा आशावाद या ठरावाच्या सूचनेत व्यक्त करण्यात आला होता.

महापालिकेच्या केईएम रुग्णालयामध्ये रुग्णांवर तातडीने उपचार करण्यात येतात. आर्थिकदृष्ट्या गरीब रुग्णांवर वैद्यकीय समाजसेवक व पीबीसीएफमार्फत मोफत उपचार करण्यात येतात. मुंबईत विविध खेळांमध्ये प्रावीण्य मिळविलेल्या होतकरू खेळाडूंना खेळ खेळताना दुखापत झाल्याची माहिती उपलब्ध झाल्यास त्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, असे प्रशासनाने आपल्या अभिप्रायात नमूद केले आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा