Advertisement

२५ वर्षांपुढील सगळ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस द्या, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी

२५ वर्षांपुढील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे केली आहे.

२५ वर्षांपुढील सगळ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस द्या, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी
SHARES

कोरोना संसर्गाचा विळखा मोठ्या प्रमाणावर तरुण वर्गाला बसल्याचं दिसत असून या वयोगटाला देखील विषाणूपासून वाचविणं आवश्यक आहे, त्यामुळे २५ वर्षांपुढील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे केली आहे. 

काही दिवसांपूर्वीच देशातील मुख्यमंत्र्यांसमवेतच्या एका व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये ४५ वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी पंतप्रधानांनी मान्य केली होती. आजच्या या पत्रात मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी धन्यवाद देऊन लसीकरण वयोगट आणखी कमी करण्याची विनंती केली आहे. लसींचे वाढीव डोस महाराष्ट्राला मिळावेत असंही या पत्रात म्हटलं आहे.

मोठ्या संख्येने तरुण वर्ग विशेषत: जो घराबाहेर कामाला जातो त्याला लस मिळाल्यास रुग्ण संख्या कमी होण्यास मदत होईल, असंही मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे.

कडक निर्बंध

याविषयी मुख्यमंत्री पत्रात म्हणतात की, कोरोना परिस्थितीसंदर्भात महाराष्ट्र ठोस पावले उचलत आहेत. राज्याने नेहमीच अतिशय पारदर्शकपणे कोरोनाविषयक माहिती मांडली असून चाचण्यांचा वेगही प्रयत्नपूर्वक वाढवला आहे. प्रत्येक कोरोना रुग्ण बरा झालाच पाहिजे या निर्धाराने आम्ही उपाययोजना करीत आहोत. गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक हानिकारक असलेल्या विषाणूला रोखण्यासाठी आम्ही ब्रेक दि चेन या मोहिमेच्या माध्यमातून काही कडक निर्बंध लावले आहेत. 

हेही वाचा- लस घ्या आणि बाकरवडी न्या! चितळेंची भन्नाट संकल्पना

मात्र यात जीवनावश्यक वस्तू व सेवा, उत्पादन क्षेत्र, वाहतूक सुरूच राहील आणि कोविडसाठी आरोग्याचे नियम सर्वजण पाळतील अशी कार्यपद्धती ठरविली आहे. कोविड लसीकरणास राज्याने अतिशय गांभीर्याने घेतलं असून ४ एप्रिल रोजीपर्यंत ७६.८६ लाख जणांना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. ३ एप्रिल रोजी तर आम्ही राज्यात सर्वाधिक म्हणजे ४.६२ लाख जणांना लस दिली.

दीड कोटी डोस मिळावेत

लसीकरण वेग वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहेच पण त्यासाठी केंद्राने जादा डोस देखील द्यावेत अशी विनंती करून मुख्यमंत्री म्हणतात की, मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या सर्वाधिक संसर्ग असलेल्या ६ जिल्ह्यांसाठी केवळ ३ आठवड्यात ४५ वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची आमची तयारी आहे, याकरिता दीड कोटी डोस मिळावेत.

केंद्र सरकारच्या सहाय्याने आणि राज्य सरकारांच्या प्रयत्नाने या कोरोना (coronavirus) संसर्गाच्या लाटेवर मात करता येणे शक्य होईल, असं सांगून मुख्यमंत्र्यांनी आधी जीवन, मग उपजीविका अशा प्राधान्याने आणि विज्ञानाच्या उपयोगाने देशाला एका नव्या सामान्य परिस्थितीत आणता येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

(all citizens above 25 years of age need covid 19 vaccine says maharashtra cm uddhav thackeray)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा