Advertisement

मुंबईत कोरोनाचा सामना करण्यासाठी ५० हजार खाटांची व्यवस्था

उपचारासाठी मुंबईच्या विविध भागांत तब्बल ५० हजार खाटांची व्यवस्था केली आहे.

मुंबईत कोरोनाचा सामना करण्यासाठी ५० हजार खाटांची व्यवस्था
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकानं मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ७० हजारांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळं मुंबई महापालिकेनं खबरदारीचा उपाय म्हणून तसंच, रुग्णांच्या संख्येत वाढ झाली तर, उपचारासाठी मुंबईच्या विविध भागांत तब्बल ५० हजार खाटांची व्यवस्था केली आहे. मुंबईत सध्या कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळं अनेक मुंबईकरांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. तसंच, केंद्रीय पथकाच्या अंदाजानुसार रुग्णांच्या संख्येत वाढ झाली तर लॉकडाऊनही वाढण्याची शक्यता आहे.

मुंबईतील कोरोना व्हायरसच्या स्थिती आणि उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक मुंबईत येऊन गेलं होतं. या पथकानं मेच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईतील करोना रुग्णांची संख्या ७० हजारांवर पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्याशिवाय, या दाव्यानुसार, राज्य सरकारनं पालिकेला उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.

कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी महापालिकेनं अधिकाऱ्यांचे स्वतंत्र पथक तयार केलं आहे. महापालिकेने सध्या अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचून चाचण्यांची संख्या वाढवली आहे. त्यामध्ये पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांवर रुग्णालये, महापालिका शाळांमध्ये उपचार सुरू केले आहेत.

महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये मिळून सध्या २५ हजार खाटा असून, शेकडो शाळा, गोरेगावचं एनएसई मैदान, वांद्रे येथील बीकेसी मैदान यांसह विविध ठिकाणी आणखी २५ हजार अशा ५० हजार खाटा उपलब्ध होणार असल्याची माहिती मिळते. त्याशिवाय, कोरोनाबाधितांसाठी कस्तुरबा रुग्णालय परिसरातच आणखी एक रुग्णालय उभारले जात आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा