Advertisement

सीझनचा पहिला आंबा घातक ठरू शकतो!


सीझनचा पहिला आंबा घातक ठरू शकतो!
SHARES

मुंबई - आंब्यांचा हंगाम सुरू झाला असून बाजारात विविध प्रकारचे आंबे येण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे आता आंब्यांच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढणार हे नक्की. पण आंबे खरेदी करताना आणि खाताना ग्राहकांनो जरा सावधान...कारण तुम्ही खरेदी केलेले आंबे कृत्रिमरित्या म्हणजे कॅल्शियम कार्बाईडचा वापर करुन पिकवलेले असू शकतात आणि असे आंबे खाणे आरोग्याला अपायकारक ठरू शकतात. त्यामुळे आंबे खरेदी करताना ग्राहकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) केले आहे.

का पिकवले जातात कृत्रिमरित्या आंबे?

आंब्यांना मोठी मागणी असल्याने या मागणीचा फायदा घेण्यासाठी विक्रेते कृत्रिमरित्या आंबे पिकवतात. कारण झाडावर नैसर्गिकरित्या आंबे पिकण्यास बराच वेळ लागतो. त्यामुळे कॅल्शियम कार्बाईड पावडरचा वापर करत आंबे पिकवण्याकडे कल असतो. कॅल्शियम कार्बाईडच्या उष्णतेमुळे काही दिवसांतच आंबा पिकतो. मागील काही वर्षापासून कृत्रिमरित्या आंबे पिकवण्याचे प्रमाण वाढले होते.

कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे खाल्ल्याने काय होणार?

  • पोटात मळमळ होणे
  • पोटात असह्य वेदना होणे
  • उलट्या होणे
  • जुलाबाचा त्रास उद्भवणे
  • तोंडात जळजळ जाणवणे
  • घशात खवखव होणे

अशा प्रकारे कृत्रिमरित्या आंबे पिकवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या विक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी दरवर्षीप्रमाणे एफडीए सज्ज झाली आहे.

एफडीएची बारीक नजर

  • एप्रिल - मे या दोन महिन्यांत विशेष मोहीम राबवत बाजारपेठांवर आणि विक्रेत्यांवर लक्ष 
  • आंब्यांचे नमुने घेत त्याची तपासणी करण्यात येणार
  • कृत्रिमरित्या पिकवण्यात आलेल्या आंब्यांचे साठे जप्त करण्यात येणार
  • आरोप सिद्ध झाल्यास दोषी विक्रेत्यांवर खटला दाखल होणार


आंबे खरेदी करताना ग्राहकांनीही विशेष काळजी घ्यावी. तसेच आपल्या ओळखीच्या विक्रेत्याकडूनच आंबे खरेदी करावेत असे आवाहन सहआयुक्त (अऩ्न) बृहन्मुंबई सुरेश अन्नपुरे यांनी केलं आहे. तसेच काही तक्रार असल्यास त्वरीत एफडीएशी संपर्क साधण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे.

असे ओळखा कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे

  • कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्याचा रंग पिवळा धमक नसतो. त्यावर पांढरे वा हिरवे डाग असतात.
  • अशा आंब्याचा रंग एकसारखा नसतो
  • हा आंबा बाहेरून पिकल्यासारखा दिसत असला तरी आतून पूर्णपणे पिकलेला नसतो.
  • नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्याचा रंग पूर्णत: केशरी असतो आणि असा आंबा कापल्याबरोबर त्यातून रस गळायला सुरूवात होते.
  • तर कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यात रस खूपच कमी असतो
  • कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्याची चवही वेगळी असते, असे आंबे खाताना घशात जळजळ होते.
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा