Advertisement

बाईक अॅम्ब्युलन्स सुसाट! 72 तासांत 35 रुग्णांवर उपचार!


SHARES

मुंबईकरांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आलेल्या बाईक अॅम्ब्युलन्स सध्या सुसाट धावत आहेत. बाईक अॅम्ब्युलन्स या राज्य सरकारच्या संकल्पनेला मुंबईकरांनी आतापर्यंत चांगला प्रतिसाद दिल्याचं चित्र आहे. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत म्हणजेच या अॅम्ब्युलन्स सुरु झाल्यानंतर 72 तासांमध्ये 35 आपत्कालीन रुग्णांवर बाईक अॅम्ब्युलन्सवर स्वार असलेल्या डॉक्टरांनी उपचार केले आहेत. ही सर्व प्रकरणं रेल्वे परिसरातील असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितलं. त्यामुळे सरकारने सुरू केलेल्या मोटार बाईक अॅम्ब्युलन्स या उपक्रमाचा फायदा मुंबईकरांना नक्कीच होईल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही.


आतापर्यंत 35 जणांवर उपचार

'बाईक अॅम्ब्युलन्स' या उपक्रमाचा बुधवारी उद्घाटन सोहळा पार पडला. त्यानंतर बाईक अॅम्ब्युलन्सवर स्वार असणारे डॉक्टर कामाला लागले आहेत. त्याच रात्री 2 रुग्णांना बाईक अॅम्ब्युलन्स या सुविधेमार्फत आपात्कालीन सेवा पुरविण्यात आली आणि गुरुवारी 12 आणि शुक्रवारी 21 रुग्णांवर या सेवेमार्फत उपचार करण्यात आले. त्यामुळे, शुक्रवारपर्यंत एकूण 35 रुग्णांवर बाईक अॅम्ब्युलन्स या सेवेमार्फत वैद्यकीय उपचार देण्यात आले, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली आहे. 

बाईक अॅम्ब्युलन्सचं उद्घाटन झाल्यावर त्याच रात्री 2 रुग्णांवर उपचार करण्यात आले.

पहिली घटना

मानखुर्द भागातील चिता कॅम्पमधील 16 वर्षीय रुग्णाला तीव्र तापाचा त्रास उद्भवल्यानंतर या हेल्पलाईनवर संपर्क करण्यात आला. त्यानंतर लगेचच बाईक अॅम्ब्युलन्सवरील डॉक्टरांनी त्या रुग्णावर उपचार केले.

दुसरी घटना

मुलुंड (पूर्व) भागातील 69 वर्षीय वृद्धावर बाईक अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून अर्धांगवायूचे उपचार (गोल्डन अवर) कालावधीच्या आत करण्यात आले. अशा बऱ्याच घटना शुक्रवारी देखील घडल्या.

 

10 ठिकाणी बाईक अॅम्ब्युलन्सची सुविधा

मुंबईतील वेगवेगळ्या 10 ठिकाणी या बाईक अॅम्ब्युलन्स असणार आहेत. 108 या हेल्पलाईन क्रमांकाच्या माध्यमातून ही सेवा पुरवली जात आहे. शहरातील ज्या भागात रुग्णावर आपत्कालीन परिस्थिती ओढवली असेल, त्या भागापासून नजीकच्या बाईक अॅम्ब्युलन्सद्वारे तत्काळ ही आरोग्यसेवा दिली जात आहे.


इथे असणार बाईक अॅम्ब्युलन्स


  1. अशोक टेकडी, जमिल नगर, भांडुप (प)
  2. चिता कॅम्प प्रसूती गृह, मानखुर्द
  3. धारावी पोलीस स्थानक
  4. नागपाडा पोलीस स्थानक
  5. कुरार पोलीस स्थानक, अप्पा पाडा, मालाड (पू)
  6. चारकोप पोलीस स्थानक
  7. गोरेगाव चित्रनगरी
  8. खार दांडा पोलीस स्थानक
  9. अप्पर आयुक्त पोलीस स्थानक, ठाकूर व्हिलेज
  10. मुंबई विद्यापीठ, कलिना कॅम्पस

तसंच, या ‘बाईक अॅम्ब्युलन्स’वरील डॉक्टर कोणतीही आपत्कालीन परिस्थिती हातळण्यास सक्षम असल्याचा दावा आरोग्य विभागाचा आहे.



हेही वाचा

अ‍ॅम्बुलन्सचा सायरन आता 120 डेसिबलने वाजणार!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा