Advertisement

मुंबईतील एसटी स्टँडवर वन रुपी क्लिनिकची सेवा मिळणार पण...


मुंबईतील एसटी स्टँडवर वन रुपी क्लिनिकची सेवा मिळणार पण...
SHARES

रेल्वे स्थानकांवरील 'वन रुपी क्लिनिक' या उपक्रमाला मिळालेल्या चांगला प्रतिसादानंतर आता ही सेवा मुंबईसह राज्यातील 50 एसटी स्टँडवरही देण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. तसा प्रस्ताव मॅजिकडिल संस्थेकडून राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना देण्यात आला आहे. दिवाकर रावते यांच्याशी या विषयावर आपली भेट सकारात्मक झाली, असा दावा डॉ. राहुल घुले यांनी दिली आहे. तर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मात्र अद्याप आपण प्रस्तावाला मान्यता दिली नसल्याची माहिती दिली आहे. 


प्रवाशांना आपात्कालीन परिस्थितीत तत्काळ उपचार आणि सेवा मिळावी उद्देशाने हा उपक्रम राबवण्याची योजना असल्याचा डॉ. घुले यांचा दावा आहे.  मुंबईतील रेल्वे स्थानकांवर ही सेवा देण्यात येत आहे. त्यानंतर मेट्रो व्यवस्थापनानेही मेट्रो स्थानकांवर ही सेवा सुरू करुन द्यावी यासाठी प्रस्ताव देण्यात आले. 


त्यानंतर आता ही सेवा एसटी स्टँडवरही सुरू व्हावी, असा प्रस्ताव वन रुपी क्लिनिकचे संस्थापक डॉ.राहुल घुले यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासमोर ठेवला. राज्यातील 50 मोठ्या एसटी स्टँड्सवर म्हणजे ज्या ठिकाणी जास्त जागा उपलब्ध आहे तिथे हे क्लिनिक सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. शनिवारी या प्रस्तावासंदर्भाची बैठक परिहवन मंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत झाली असल्याची माहिती वन रुपी क्लिनिकचे संस्थापक डॉ. राहुल घुले यांनी दिली.


“ शनिवारी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत झालेली बैठक ही सकारात्मक आहे. फक्त ज्या एसटी स्टँडवर या क्लिनिकसाठी पुरेशी जागा असेल तिथेच हे क्लिनिक्स उभारले जातील. आम्ही फक्त जागेसाठी परवानगीची वाट पाहात आहोत. एकदा जागा मिळाली की आम्ही लगेचच वन रुपी क्लिनिकची सेवा सुरू करणार आहोत. ”

डॉ. राहुल घुले , संस्थापक, वन रुपी क्लिनिक


मुंबईतील परळ, मुंबई सेंट्रल आणि नेहरुनगर या एसटी स्टँड्सवर पुरेशी जागा असल्याकारणाने या एसटी स्टँडवर प्रायोगिक तत्वावर क्लिनिक्स उभारले जातील, असंही डॉ.घुले यांनी स्पष्ट केलं आहे. तर, राज्यातील प्रमुख एसटी स्टँड्सवर या संकल्पनेची लवकरच अंमलबजावणी करणार असंं दिवाकर रावते यांनी सांगितलं असल्याचंही डॉ. राहुल घुले यांनी सांगितलं आहे.

तर, याविषयी खुद्द परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना संपर्क साधला असता त्यांनी या बातमीला दुजोरा दिलेला नाही. असा प्रस्ताव आपल्याकडे आला, पण आपण त्याबाबतीत अंतिम निर्णय घेतलेला नाही. प्रस्तावकर्त्याला राज्याच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचा सल्लाही आपण दिल्याची माहिती दिवाकर रावते यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे. 

प्रवाशांना तत्काळ आणि परवडणाऱ्या खर्चात ही आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे. या क्लिनिकमध्ये रात्रंदिवस एमबीबीएस आणि एमडी डॉक्टर्स उपलब्ध असणार आहेत. तसंच औषधांसाठी फार्मसी रुम ही क्लिनिकच्या बाजूलाच उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. डॉ.राहुल घुले यांनी ही माहिती दिली आहे. 

दीड महिन्यांत जवळपास 13 हजार रुग्णांची तपासणी

ही आरोग्यसेवा सुरू झाल्यानंतर आतापर्यंत 13 हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकांवर सुरू झालेल्या वन रुपी क्लिनिकमध्ये वैद्यकीय सुविधाही निम्म्या किंमतीत दिली जाते.

वन रुपी क्लिनिक ची योजना सर्वसामान्य रुग्णांच्या हिताची आहे, असं चित्र रंगवलं गेलं आहे. रुग्णांच्या भल्यासाठी जर योजना राबवली जाणार असेल, तरच ती अंमलात यायला हवी, असं मत बैद्यकीय क्षेत्रातल्या जाणकारांनी व्यक्त केलं आहे. संबंधित विषय