तौक्ते चक्रीवादळानंतर (Tauktae Cyclone) मुंबई महापालिकेने बीकेसी, दहिसर आणि मुलुंड जंबो कोविड सेंटर (Covid Centers) दुरुस्तीच्या कामासाठी बंद केली होती. ही केंद्र पुन्हा १ जूनपासून सुरू होणार होती. मात्र, आता ही केंद्र सध्या तरी सुरू होणार नसल्याचं पालिकेने सांगितलं आहे. कोरोना रूग्णांमध्ये पुन्हा वाढ झाल्यास ही तीनही केंद्रे सुरू केली जातील, असंही पालिकेने म्हटलं आहे.
तौक्ते चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन मुंबई पालिकेने दहिसर, मुलुंड आणि बीकेसी कोविड सेंटरमधील ५८१ रुग्णांचे विविध कोविड सेंटर व रुग्णालयात स्थलांतर केलं होतं. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळं वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्स येथील कोविड सेंटरला फटका बसला. कोविड सेंटरचे पत्रे उडून गेले होते. तसंच सेंटरचं मोठं नुकसान झालं होतं.
या नंतर पावसाळ्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी या तिन्ही केंद्रांची दुरुस्ती करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. मात्र, सध्या मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. त्यामुळे दुरुस्ती झाल्यानंतरही तीन जंबो कोविड केंद्रे बंदच ठेवण्यात आली आहेत.
मुंबईत पुन्हा कोरोना रूग्णांची संख्या वाढल्यास ती त्वरित कार्यान्वित होईल, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले. सध्या मुंबईतील भायखळा, वरळी आणि गोरेगाव येथे तीन जंबो कोविड केअर केंद्रे कार्यरत आहेत.
हेही वाचा -
मुंबईच्या चौपाट्यांवर पोलिसांची आता ‘एटीव्ही’वरून गस्त
मुंबई उपनगरातील नागरिकांना दिलासा, गोरेगावमध्ये 'इथं' नवं ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र सुरू