Advertisement

माहुलमध्ये उभारण्यात येणार ऑक्सिजन बॉटलिंग प्लांट

माहुल इथल्या बीपीसीएल कंपनीजवळ ऑक्सिजन बॉटलिंग प्लांट उभारला जाणार आहे.

माहुलमध्ये उभारण्यात येणार ऑक्सिजन बॉटलिंग प्लांट
SHARES

ऑक्सिजनअभावी रुग्णांचा जीव जाऊ नये, यासाठी महापालिकेनं अधिकाधिक ठिकाणांहून ऑक्सिजन मिळवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. माहुल इथल्या बीपीसीएल कंपनीजवळ ऑक्सिजन बॉटलिंग प्लांट उभारला जाणार आहे.

बीपीसीएलद्वारे पुरवठा केल्या जाणाऱ्या या प्लांटमधून ऑक्सिजननं भरलेले सिलिंडर पालिकेच्या आवश्यक असलेल्या रुग्णालय आणि कोरोना उपचार केंद्रांना पुरवले जाणार आहेत. प्लांट उभारणीसाठी २१ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.

मुंबईत करोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आलं आहे. तरी कोरोनाची तिसरी लाट येण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. डेल्टा व्हेरिएंटचे देखील संकट उभे आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेनं विविध प्रकारच्या उपाययोजना वाढवल्या आहेत. त्यात ऑक्सिजन निर्मिती, पुरवठा आणि अन्य बाबींचा समावेश आहे.

विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे. त्यामुळे ऑक्सिजन उत्पादक आणि पुरवठादार यांच्या यंत्रणेवर काहीसा ताण पडत आहे. पालिका सध्या ड्युरा आणि जम्बो सिलिंडरचे पुनर्भरण रबाळे आणि तुर्भे इथल्या ऑक्सिजन पुरवठदारांच्या प्लांटमधून करत आहे.

पालिकेला आणि खासगी रुग्णालयांना या एकमात्र पुरवठादारावर विसंबून राहावं लागत आहे. त्यामुळे पालिकेनं ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी बीपीसीएल कंपनीच्या माहुलजवळील भूखंडावर ऑक्सिजन बॉटलिंग प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

बीपीसीएल कंपनीनं पाइपलाइनद्वारे या प्लांटमध्ये दिवसाला जवळपास १० ते १५ मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचं मान्य केलं आहे. करोनाच्या काळात ऑक्सिजन विनाशुल्क देण्याचंही मान्य केलं आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडण्यात आला आहे.

प्लांटमधील ऑक्सिजनचा वापर करून आणीबाणीच्या काळात दिवसाला ७.१ क्यूबिक मीटर क्षमतेचे १,५०० जम्बो ऑक्सिजन सिलिंडर भरण्याचे पालिकेचे नियोजन आहे. या प्लांटमधील ऑक्सिजनच्या पुरवठ्यामुळे विविध रुग्णालयांना ऑक्सिजनची गरज भासल्यास विनाअडथळा ऑक्सिजनचा पुरवठा करणे सुलभ होणार आहे.

प्लांट उभारणीच्या कामासाठी पालिकेनं मे. मॅक एंटरप्रायझेस या कंत्राटदाराला काम देण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील तीन महिन्यांत हे काम पूर्ण केलं जाणार आहे. ऑक्सिजननं भरलेल्या जम्बो सिलिंडरची वाहतूक कंत्राटदारानं करून द्यायची आहे. पाच वर्षे या प्लांटची सेवा, देखभाल कामं कंत्राटदार करणार आहे.



हेही वाचा

घरोघरी जाऊन केलं जाणार लसीकरण, पुण्यातून होणार सुरुवात

Covid Updates: ठाण्यातील Delta Plus चा एकमेव रुग्ण झाला बरा

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा