Advertisement

मुंबईत कोरोना लसीकरण केंद्रात होणार वाढ

मुंबई महानगरपालिका २४ विभाग कार्यालयांमध्ये लसीकरणाच्या केंद्रांत वाढ करणार आहे.

मुंबईत कोरोना लसीकरण केंद्रात होणार वाढ
SHARES

मुंबई महानगरपालिका २४ विभाग कार्यालयांमध्ये लसीकरणाच्या केंद्रांत वाढ करणार आहे. प्रत्येक विभागात ३ लसीकरण केंद्र सुरु करण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतला आहे. त्यामुळं मुंबईकरांना आता घराजवळच कोरोना लसीकरणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. मुंबईसह राज्यात ४ दिवस लसीकरण कार्यक्रम घेण्यात येणार आहे. मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार या ४ दिवशी लस दिली जाईल. मुंबई महापालिका क्षेत्रात दररोज ४ हजार जणांना लस देण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. शिवाय, टप्प्याटप्प्यानं त्यात वाढ करण्यात येणार आहे.

मुंबईत लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली असून, पहिल्या दिवशी १ हजार ९०० पेक्षाहून अधिक लोकांचं लसीकरण करण्यात आलं. कोविन अॅपमधील तांत्रिक बिघाडामुळं लसीकरणाचा कार्यक्रम २ दिवस स्थगित करण्यात आला होता. मंगळवारपासून पुन्हा कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे.

मुंबईत पहिल्या टप्प्यात १.२५ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात फ्रंट लाइन कर्मचारी आणि तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षापुढील नागरिकांना लस दिली जाणार आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी अधिक जणांना लस द्यायची असल्यानं महापालिका प्रशासनानं आपल्या लसीकरण केंद्रात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. लसीकरणाचा तिसरा टप्पा ही लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

निर्धारित लसीकरण केंद्रांवर लाभार्थींची गर्दी होण्याची शक्यता आहे. ही गर्दी टाळण्यासाठी पालिका प्रत्येक विभागात लसीकरण केंद्र सुरु करणार आहे. प्रत्येक विभागात ३ लसीकरण केंद्र सुरु केली जाणार आहेत. मुंबईत महापालिकेचे २४ विभाग कार्यालय असून, त्यामध्ये एकूण ७२ केंद्र तयार केली जाणार आहेत. ही केंद्रे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी असणार आहेत.

तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण कार्यक्रमात दिवसाला साधारणता १० हजार पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचं लसीकरण करावं लागणार आहे. त्या कामासाठी मोठा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग लागणार असून त्यासाठी १० हजारपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना लसीकरणाचं प्रशिक्षण देण्यात येत आहे. या केंद्रामुळं दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील व्यक्तींना त्यांच्या घराजवळच लसीकरणाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा