Advertisement

वडाळ्यात स्वच्छतेबाबत जनजागृती


वडाळ्यात स्वच्छतेबाबत जनजागृती
SHARES

वडाळा पूर्व येथील मुंबई पोर्ट ट्रस्ट रुग्णालयाच्या परिसरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि चिकित्सा विभागाच्या वतीने गुरुवारी राबविण्यात आली. तसेच रुग्णालय आणि कामगार वसाहतीमध्ये स्वच्छेतेबाबत हातात फलक घेऊन जनजागृतीपर घोषणा यावेळी देण्यात आल्या. यात मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ए. अण्णादुराई, वरिष्ठ उपप्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजाता मोकल, डॉ. विराज पुरोहित, स्वच्छता पर्यवेक्षक संजय धुमाळ आदी डॉक्टर, परिचारिका आणि चतुर्थ श्रेणी कामगार या मोहिमेत सहभागी झाले होते.

रुग्णालय आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि सुदंर रहावा यासाठी स्वच्छता मोहीम हा उपक्रम मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि चिकित्सा विभागाच्या वतीने हाती घेण्यात आला आहे. या मोहिमेअंतर्गत रुग्णालय परिसर स्वच्छतेबरोबर मुंबई पोर्ट ट्रस्ट कामगार वसाहतीत नागरिकांना स्वच्छतेबाबत जागृत करण्यात येत आहे. अनेक लोक खिडकीतून कचरा अथवा शिळे अन्न, माशांची घाण प्लास्टिक पिशवीत भरून बाहेर फेकतात. यामुळे अस्वच्छतेबरोबर दुर्गंधी पसरते आणि डासांचा प्रादुर्भाव वाढतो. परिणामी रोगराई पसरते. त्यात पावसाळा ही जवळ आल्याने अशा प्रकारे कचरा फेकणे बंद झाले नाही तर रोगराईच्या प्रमाणात अधिक भर पडेल. यावर नियंत्रण यावे, यासाठी स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. 

दरम्यान, स्थानिक नागरिकांना ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे वेगवेगळे वर्गीकरण करा. उंदीर, घुशींचा वावर वाढेल असे पदार्थ अथवा शिळे अन्न बाहेर टाकणे टाळा आदी जनजागृतीपर संदेश यावेळी देण्यात आले. रुग्णालय परिसर हा नेहमीच स्वच्छ आणि नीटनेटका असल्यास रुग्णांनाही प्रसन्न वाटते. त्यामुळे रोज जरी साफ सफाई येथे करण्यात येत असली तरी आठवड्यातून एकदा भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात येते. अनेक रुग्ण वातावरणामुळे लवकर बरे होतात. असे स्वच्छता पर्यवेक्षक संजय धुमाळ यांनी संगितले.

संबंधित विषय
Advertisement