Advertisement

जे.जे. रुग्णालयात लवकरच कॅन्सर उपचार- अमित देशमुख

जे. जे. रूग्णालयाला १५० वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्तानं या रुग्णालयात कॅन्सर उपचार विभाग सुरू करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे.

जे.जे. रुग्णालयात लवकरच कॅन्सर उपचार- अमित देशमुख
SHARES

मुंबईतील परळ परिसरातील टाटा कर्करोग रुग्णालयानंतर (TATA Cencer Hospital) आता जे. जे. रुग्णालयात (J. J. Hospital) कॅन्सर उपचार सुरू करण्यात येणार आहेत. जे. जे. रूग्णालयाला १५० वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्तानं या रुग्णालयात कॅन्सर उपचार विभाग सुरू करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख (Medical Education Minister Amit Deshmukh) यांनी मंगळवारी विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात दिली. वैद्यकीय शिक्षणाला अत्यावश्यक सेवा म्हणून सरकारकडून मान्यता देण्यात आली असून त्याबाबतचा शासन निर्णय लवकरच जारी करण्यात येणार असल्याचंही त्यांनी म्हटलं.

जे. जे. हे नामांकित रूग्णालय असल्यानं इथं राज्यभरातून उपचारासाठी (Treatment) रुग्ण येत असतात. त्यामुळं सरकारनं इथं कॅन्सर रूग्णालय सुरू करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे यांनी केली. यावर कॅन्सर हा भयंकर आजार असून त्यात संशोधन करण्याची गरज आहे. त्यासाठी सरकार निश्चित पावले उचलणार आहे. जे. जे. रुग्णालयाला दीडशे वर्षे पूर्ण होत असल्याने कॅन्सर संशोधन विभाग सुरू करणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.

जे. जे. रुग्णालयासह काही रुग्णालयातील केमिस्टची देयकं थकली असून, त्यामुळं रुग्णालयास होणारा औषधपुरवठा बंद झाला आहे. परिणामी काही रुग्णांवरील शस्त्रक्रिया खोळंबल्या आहेत. याविषयीचा मुद्दा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सदस्य जोगेंद्र कवाडे यांन लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना देशमुख यांनी, 'जे. जे. रूग्णालयाची २९ कोटी रूपयांची थकबाकी होती, ती थकबाकी पूर्णपणे अदा करण्यात आली आहे. आता औषधपुरवठा सुरळीत झाला आहे. जे. जे. समूहातील रूग्णालयात हाफकिन महामंडळातर्फे औषधे व सर्जिकल बाबींचा पुरवठा करण्यात येणार होता. मात्र काही अडचणीमुळे त्यांच्या सूचनेनुसार स्थानिक औषध पुरवठादारांकडून खरेदी करण्यात आलेली आहे. औषधे खरेदीबाबत काही बदल करण्याचा विचार सरकार करत आहे’, असं म्हटलं.



हेही वाचा -

मेट्रो स्थानकांची मॉल्सना थेट जोडणी?

मुंबई-पुणे रेल्वे प्रवास होणार आरामदायी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा