Advertisement

टीबीच्या औषधांचा तुटवडा, केंद्राचे महत्त्वाचे निर्देश

टीबीच्या औषधांचा साठा मार्च अखेर किंवा एप्रिलपर्यंत पुरेल एवढा असल्याचे समोर आले आहे.

टीबीच्या औषधांचा तुटवडा, केंद्राचे महत्त्वाचे निर्देश
SHARES

काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रासह देशात क्षयरोगावरील औषधांचा तुटवडा निर्माण झाला होता. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने क्षयरोगावरील औषधांच्या खरेदीची प्रक्रिया तातडीने सुरू केली. मात्र आजही चार-एफडीसी आणि तीन-एफडीसी प्रकारच्या औषधांचा साठा केवळ एक महिन्यासाठी उपलब्ध आहे. या औषधांचा साठा मार्चअखेर किंवा एप्रिलपर्यंत पुरेल एवढा असल्याचे समोर आले आहे.

येत्या काही दिवसांत औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध न झाल्यास केंद्र सरकारच्या ‘टीबीमुक्त भारत’ योजनेला खीळ बसण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने देशातील सर्व राज्यांना स्थानिक पातळीवर औषधे खरेदी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, ही औषधे स्थानिक पातळीवर उपलब्ध नसल्याने राज्यांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे.

काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, ओरिसा, बिहार, छत्तीसगड या राज्यांसह देशभरात टीबीच्या औषधांचा तुटवडा निर्माण झाला होता. यासंदर्भात देशातील क्षयरोगविरोधी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवला. याची दखल घेत केंद्र सरकारने ‘क्षयमुक्त भारत’ अभियान अधिक कार्यक्षमतेने राबवता यावे यासाठी क्षयरोगविरोधी औषधांची खरेदी तातडीने सुरू केली. त्यासाठी राष्ट्रीय स्तरावर क्षयरोग प्रतिबंधक औषधांच्या खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पुरवठादारांना खरेदीचे आदेशही देण्यात आले.

क्षयरोगावरील काही औषधांचा पुरवठाही पुरवठादारांकडून सुरू झाला. परंतु राष्ट्रीय स्तरावर चार-एफडीसी आणि तीन-एफडीसी प्रकारची औषधे उपलब्ध नाहीत. तांत्रिक अडचणींमुळे या औषधांचा पुरवठा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने ही औषधे स्थानिक पातळीवर खरेदी करण्याच्या सूचना राज्य सरकारांना दिल्या आहेत.

औषधे खरेदी करताना बाजारात उपलब्ध असलेली औषधे आणि संबंधित घटकांची खरेदी करावी. तसेच मोफत औषधे देणे शक्य नसल्यास रुग्णांना औषधांच्या किमतीची परतफेड करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

क्षयरोग आणि एड्सशी संबंधित औषधांचा पुरवठा आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून केला जातो. त्यामुळे केंद्र सरकारकडून ही औषधे खरेदी केली जातात. काही पुरवठादार ही औषधे स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देत असले तरी त्यांना मर्यादा आहेत. त्यामुळे ही औषधे स्थानिक पातळीवर घेणे राज्य सरकारना अवघड आहे. परिणामी स्थानिक पातळीवर औषधे मिळणे अशक्य असल्याचे क्षयरोगाच्या विरोधात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे.



हेही वाचा

मोबाईल ॲपद्वारे बीएमसी हॉस्पिटलमध्ये लवकरच अपॉइंटमेंट बुक करता येणार

अंधेरीतील अंबानी रुग्णालयाच्या शेजारी उभे राहणार ट्रस्टीचे रुग्णालय

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा