Advertisement

बंद कोरोना काळजी केंद्रे पुन्हा सुरू करणार


बंद कोरोना काळजी केंद्रे पुन्हा सुरू करणार
SHARES

मुंबईत सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. त्याशिवाय, भविष्यात संशयित रुग्णांची वाढती संख्या आणि सध्या संस्थात्मक विलगीकरण केंद्रात उपलब्ध खाटा यांचे प्रमाण तुलनेत व्यस्त होण्याची शक्यता लक्षात घेत यापूर्वी बंद केलेली कोरोना काळजी केंद्रे पुन्हा कार्यान्वित करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

करोना संशयितांमधील अतिजोखमीच्या आणि कमी जोखमीच्या गटांतील व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरण केंद्रात रवानगी करून संसर्ग रोखण्याचे प्रयत्न पालिकेने सुरू केले होते. त्यासाठी पालिकेने मुंबईत ठिकठिकाणी ५० हजार ७७ खाटांची क्षमता असलेली ३२८ ‘कोरोना काळजी केंद्र-१’ सुरू केली. त्याचबरोबर २४ हजार १२५ खाटांची क्षमता असलेली १७४ ‘कोरोना काळजी केंद्र-२’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यापैकी आवश्यक असलेली ५ हजार ४० खाटा क्षमता असलेली केवळ ६० ‘कोरोना काळजी केंद्र-२’ कार्यान्वित करण्यात आली. मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या जुलैमध्ये हळूहळू कमी होऊ लागली. परिणामी, त्यांच्या संपर्कातील संशयित रुग्णांची संख्याही घसरू लागली. संशयित रुग्णांना काही अटीसापेक्ष घरातच विलगीकरणातची परवानगी देण्यात आली. यामुळे कोरोना काळजी केंद्रांमधील बहुसंख्य खाटा रिक्तच होत्या.

केंद्रावरील खर्च नियंत्रणात आणण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांवरील ताण हलका करण्यासाठी टप्प्याटप्प्याने गरज नसलेली केंद्रे बंद करून विभाग कार्यालयाच्या हद्दीत केवळ २ केंद्रे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. सध्यस्थितीत १७,६९८ खाटांची क्षमता असलेली ४३ ‘कोरोना काळजी केंद्र-१’ सुरू असून तेथे २,४२२ कोरोनाबाधितांच्या संपर्कातील संशयित रुग्ण दाखल आहेत. संशयित रुग्णांची संख्या वाढल्यास तातडीने २,१५८ खाटा असलेली १५ ‘कोरोना काळजी केंद्र-१’ सुरू करण्यात येणार आहेत. तर उर्वरित २६,७३३ खाटांची क्षमता असलेली २७६ ‘कोरोना काळजी केंद्र’ आरक्षित आहेत. 

आजघडीला २,९४१ खाटांची क्षमता असलेली २४ ‘करोना काळजी केंद्र-२’ कार्यान्वित असून गरजेनुसार २,३३० खाटा असलेली १३ ‘करोना काळजी केंद्र-२’ सुरू करण्यात येणार आहेत. तर तब्बल १८,४२२ खाटांची क्षमता असलेली १४४ ‘कोरोना काळजी केंद्र’ सज्ज आहेत. मात्र संशयित रुग्णांची संख्या वाढली तरच ही केंद्रे कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती मिळते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा