Advertisement

मृतदेहांशेजारी कोरोना रुग्णावर उपचार, सायन रुग्णालय प्रशासनाने दिले चौकशीचे आदेश

सायनच्या लोकमान्‍य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहांशेजारीच इतर काेरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मृतदेहांशेजारी कोरोना रुग्णावर उपचार, सायन रुग्णालय प्रशासनाने दिले चौकशीचे आदेश
SHARES

सायनच्या लोकमान्‍य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहांशेजारीच इतर काेरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरून रुग्णालय प्रशासन आणि सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आल्यावर अखेर या प्रकाराच्या चौकशीचे आदेश रुग्णालय प्रशासनाने दिले आहेत.  

सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयातील एका वाॅर्डात जागोजागी खाटांवर ठेवलेले असताना या मृतदेहाच्या बाजूला रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा व्हिडिओ भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर टाकला होता. हा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होताच, चोहोबाजूंनी सरकारवर टीका व्हायला लागली. 

२४ तासांत अहवाल

या वादग्रस्त प्रकारावर रुग्णालय प्रशासनाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्टीकरण देखील देण्यात आलं आहे. त्यात म्हटलं आहे की,

या चित्रफितीची सत्‍यता आणि वास्तविकता पडताळण्‍यासाठी एक चौकशी समिती गठीत करण्‍यात आली आहे. २४ तासात त्‍याचा अहवाल मागविण्‍यात आला आहे. या चौकशीत आढळलेल्‍या दोषींवर योग्य ती कारवाई करण्‍यात येईल.  

हेही वाचा - मृतदेहांशेजारी रुग्णांवर उपचार, हाच का तुमचा सायन पॅटर्न?- आशिष शेलार

नातेवाईकांकडून टाळाटाळ

यापूर्वी २ मे २०२० रोजी काढलेल्‍या परिपत्रकाद्वारे  (क्र. लोटिरु / १०८ / अधिष्‍ठाता ), राज्‍य शासनाने  प्रसारित केलेल्‍या मार्गदर्शक तत्‍वानुसार, कोविड-१९ कक्षातील तसंच संशयित कोविड रुग्‍णांच्‍या कक्षातील मृतदेह,  मृत्‍युनंतर ३० मिनिटामध्‍ये रुग्‍णाच्‍या नातेवाईकांच्‍या ताब्‍यात देण्‍याविषयी संबंधितांना निर्देश देण्‍यात आले होते. परंतु अनेकवेळा रुग्‍णाचे नातेवाईक मृतदेह ताब्‍यात घेण्‍यास उपलब्‍ध नसतात. त्यांना वारंवार फोन करूनही ते येण्यास टाळाटाळ करतात. अशा परिस्थितीत संबंधित पोलीस ठाण्‍यास तसंच आपत्‍ती व्‍यवस्‍थापन विभागास कळविण्‍याची वेळ येते. तसंच सर्व प्रशासकीय प्रक्रिया पार पाडून मृतदेह शवागारात पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्‍यात येतो.

काळजी घेण्याची सूचना

असं असले तरी, अशाप्रकारच्या घटना भविष्‍यात घडू नयेत म्‍हणून रुग्‍णालय प्रशासन सर्वप्रकारची काळजी घेत आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सक्त निर्देश देण्यात येत आहेत.

कोविड १९ विषाणू विरुद्धच्या लढाईत आरोग्य यंत्रणा पूर्णपणे झोकून देऊन काम करीत आहे. बाधितांना तसंच सर्वसामान्य मुंबईकरांना योग्य ती आरोग्यसेवा मिळावी म्हणून महानगरपालिका प्रशासन वचनबद्ध आहे. अशा घटनांमुळे तसंच विविध अडचणीमुळे विचलित न होता यापुढेही खंबीरपणे आरोग्य यंत्रणा काम करीत राहील, असं आश्वासन देखील रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आलं आहे. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा