Advertisement

उच्चभ्रू वस्त्यांमध्ये वाढतायेत रुग्ण, अंधेरी पश्चिममध्ये सर्वाधिक रुग्ण वाढ

मुंबई उपनगरातील अंधेरी पश्चिम हा सर्वाधिक रुग्ण वाढीचा दर असलेला वॉर्ड आहे. अंधेरीतल्या अनेक उच्चभ्रू वस्त्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.

उच्चभ्रू वस्त्यांमध्ये वाढतायेत रुग्ण, अंधेरी पश्चिममध्ये सर्वाधिक रुग्ण वाढ
SHARES

मुंबईत रोज कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. उच्चभ्रू वस्त्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचं दिसून येत आहे.  मुंबई उपनगरातील अंधेरी पश्चिम हा सर्वाधिक रुग्ण वाढीचा दर असलेला वॉर्ड आहे. अंधेरीतल्या अनेक उच्चभ्रू वस्त्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.

अंधेरी भागात रोज सरासरी ९२ नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. उच्चभ्रू  लोखंडवालामधील रहेजा क्लासिक या इमारतीत सध्या ११ कोरोनाचे रुग्ण आहेत. मुंबई महापालिकेच्या कोविड नियमानुसार इमारतीत पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास ती सील करण्यात येते. पण ही इमारत सील केलेली नाही. येथील दैनंदिन व्यवहार सुरू असल्याने कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका वाढला आहे. अंधेरी भागात असणाऱ्या हॉटेल्स, पब्समध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नसल्याचं दिसून आलं आहे. येथील गर्दी कोरोनाचा फैलाव वाढवण्यास कारणीभूत ठरणारी आहे.

अंधेरी पश्चिममध्ये आठवड्याचा रुग्ण वाढीचा दर ०.४२ टक्के आहे. मागील आठवडाभरात येथे साडे सहाशे रुग्ण आढळले आहेत. २७ फेब्रुवारीच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत एकूण २१ हजार ६६० इतकी रुग्ण संख्या या वॉर्डात होती. ६ मार्चला ही संख्या २२,३०२ झाली आहे.  २८ फेब्रुवारीला ८७, ३ मार्चला ९६, ४ मार्चला १०७, ५ मार्चला ११९ आणि ६ मार्चला ९७ नवीन रुग्ण अंधेरी पश्चिममध्ये आढळले. अंधेरी पश्चिम येथील ३० इमारती सील केल्या गेल्या आहेत. 

अंधेरी पश्चिम पाठोपाठ एच पश्चिम  म्हणजेच बांद्रा पश्चिम हा वॉर्ड कोरोनाचा हाॅटस्पाॅट बनत आहे. येथील रुग्ण वाढीचा दर ०.४१ टक्के आहे. त्यानंतर रुग्ण वाढीत एफ उत्तर म्हणजेच माटुंगा तिसर्‍या क्रमांकावर, मुलुंड चौथ्या क्रमांकावर, एम पश्चिम चेंबूर पश्चिम पाचव्या तर चेंबूर ईस्ट सहाव्या क्रमांकावर आहे.

मुंबईत सध्या बी विभाग म्हणजे सँडहर्स्ट रोड विभागात रुग्ण वाढीचा दर सर्वात कमी आहे. त्याखालोखाल मरीन लाईन, तर जी उत्तर म्हणजे दादर माहीम आणि धारावी, भायखळा म्हणजेच ई वॉर्ड या भागात रुग्ण वाढीचा वेग कमी आहे.

मुंबईत सध्या एकूण १८ कंटेन्मेंट झोन आहेत. कंटेन्मेंट झोनमध्ये चाळी आणि झोपडपट्टी यांचा समावेश होतो. त्याचबरोबर सील असणाऱ्य इमारतीची संख्या १९२ आहे. तर ५ पेक्षा कमी रुग्ण आढळले असल्याने इमारतीमधील २४५० मजले सील करण्यात आले आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा